आपल्या दमदार अभिनयशैलीमुळे आज अनेकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे वरुण धवन. सध्या तो आगामी 'व्हीडी 18' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरु असतानाच वरुण धवन जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
दररोज चित्रपटाच्या सेटवर कलाकार जखमी झाल्याच्या बातम्या येत असतात. असेच काहीसे अभिनेता म्हणजे वरुण धवनसोबत झाले आहे. वरुण धवनच्या पायाला दुखापत झाली. इन्स्टाग्राम स्टोरीजच्या माध्यमातून त्यानं चाहत्यांना जखमी झाल्याची माहिती दिली. वरुण धवनने त्याच्या जखमी पायाचा एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये अभिनेता आईस थेरपी घेताना दिसत आहे. तसेच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वरुण धवन त्याचा जखमी पाय बर्फाच्या पाण्याने भरलेल्या बेसिनमध्ये टाकताना दिसत आहे. यासोबतच मला ही दुखापत कशी झाली, हे माहीत नाही, कदाचित शुटिंगदरम्यान झाली असावी, असं त्यानं सांगितलं.
वरुण धवन शेवटचा नितेश तिवारी दिग्दर्शित बवाल चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता तो एटली कुमार दिग्दर्शित 'व्हिडी 18' या चित्रपटात दक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेशसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. हा चित्रपट 31 मे 2024 रोजी रिलीज होणार आहे. एटली आणि वरुण धवन पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.