बॉलिवूड अभिनेता वरुण धवन लवकरच भेडीया चित्रपटात दिसणार आहे. सध्या तो या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसतो आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसला. दरम्यान, वरुण धवनने वेस्टीबुलर हायपोफंक्शन या आजाराने ग्रस्त असल्याचा खुलासा केला आहे. हे समजल्यावर त्याचे चाहते चिंतेत आहेत.
अभिनेता वरुण धवनने भेडीया चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटासोबत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला. तो म्हणाला की, सध्या तो 'वेस्टीबुलर हायपोफंक्शन' या आजाराचा सामना करतो आहे. या आजारामुळे आपल्या शरीराचा तोल सांभाळणं कठीण होऊन जाते. कोरोनानंतर जेव्हा काम सुरू झाले तेव्हा अभिनेत्याला या आजारामुळे खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे मनाविरोधात जाऊन शूटिंगमधून ब्रेक घेण्याचा निर्णय त्याला घ्यावा लागला.
जेव्हा वरुणला वेस्टीबुलर हायपोफंक्शन या आजाराविषयी समजलं तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला होता. त्यावेळी सगळे संपले असे वाटत होते.. या सगळ्यातून बाहेर येणे ही त्याच्यासाठी आव्हानात्मक बाब होती. कोरोनानंतर जेव्हा शूटिंग सुरू झाले तेव्हा या आजाराने डोके वर काढलं आणि त्याच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा केला होता, असे वरूण सांगत होता. 'जुग जुग जियो'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळावा, चित्रपट चांगला व्हावा यासाठी आपण खूप ताण घेतल्याचे वरुणने सांगितले. तो म्हणाला. मला वाटत होते की मी कोणत्या निवडणुकीत भाग घेतला आहे. मला माहित नाही मी स्वतःवर इतका दबाव का टाकला होता, पण मी ते केले होते हे नक्की.
वेस्टिबुलर हायपोफंक्शन आजार नेमका काय आहे?वेस्टिबुलर हायपोफंक्शन आजार म्हणजे कानातील एक बॅलन्स सिस्टम असते, जी या आजारात व्यवस्थित काम करत नाही. कानाच्या आत वेस्टिबुलर सिस्टम असते, जी डोळ्यांच्या सहाय्याने काम करत असते. आपल्या स्नायूंना बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत असते. जेव्हा ही सिस्टम व्यवस्थित काम करत नाही, तेव्हा कानानं ऐकू येणाऱ्या गोष्टी मेंदूपर्यंत नीट पोहोचत नाही आणि त्या व्यक्तीला ही समस्या आहे त्याला चक्कर यायला लागते.