वरुण धवन (Varun Dhawan) आणि समंथा रुथ प्रभूची (Samantha Ruth Prabhu) 'सिटाडेल हनी बनी' ही सीरिज नुकतीच रिलीज झाली. नुकतंच दोघांनी सीरिजच्या प्रमोशननिमित्त अनेक ठिकाणी हजेरी लावली. दरम्यान एका इव्हेंटमध्ये वरुण धवन पत्नी आणि लेकीविषयी भरभरुन बोलताना दिसला. तेव्हा बाजूला बसलेल्या समंथाचा चेहरा पडल्याचं सर्वांना लक्षात आलं. समंथाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
वरुण आणि समंथाने 'द हॉलिवूड रिपोर्टर' मध्ये हजेरी लावली. यावेळी वरुण धवन म्हणाला, "मी आणि नताशा फॅमिली प्लॅनिंग करत होतो. मला माझी एक छोटी फॅमिली असेल असं खूप वाटत होतं. सीरिजमधील बनी या कॅरेक्टरसोबत मी म्हणूनच खूप जुळवून घेऊ शकलो. कारण खऱ्या आयुष्यात मी त्याच टप्प्यातून जात होतो. आज मला एक मुलगी आहे त्यामुळे तिच्या संरक्षण करणं, एक बाबा आपल्या लेकीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो हे मी नक्कीच समजून घेऊ शकलो." हे बोलत असताना समंथाच्या चेहऱ्यावर उदासीनता स्पष्ट दिसत होती. तरी तिने नंतर स्वत:ला सावरलं.
समंथाचा हा व्हिडिओ बघून चाहत्यांनाही वाईट वाटत आहे. नेटकऱ्यांनी व्हिडिओ शेअर करत समंथाला स्ट्राँग राहण्याचा सल्ला दिला आहे. समंथा आणि नागा चैतन्य यांनी २०१९ मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर दोन वर्षात २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर समंथाने मोठ्या आजाराचाही सामना केला. समंथाने आयुष्यात बरंच काही झेललं आहे त्याचंच दु:ख तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.