Join us

वेदा, स्त्री २, खेल खेल में, डबल इस्मार्ट... यंदाच्या स्वातंत्र्यदिनी बॉक्स ऑफिसवर चौरंगी लढत

By संजय घावरे | Published: July 15, 2024 8:08 PM

Bollywood Movies, Independence Day: भारतीय स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त बिग बजेट चित्रपटांसाठी नेहमीच महत्त्वाचा मानला जातो

Bollywood Movies, Independence Day: संजय घावरे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भारतीय स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त बिग बजेट चित्रपटांसाठी नेहमीच महत्त्वाचा मानला जातो. यंदा या मुहूर्तावर चक्क चार चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा २’ पुढे गेल्याने ‘वेदा’, ‘स्त्री २’, ‘खेल खेल में’ आणि ‘डबल इस्मार्ट’ या चित्रपटांमध्ये चौरंगी लढत होणार आहे.

‘वेदा’, ‘स्त्री २’, ‘खेल खेल में’ आणि ‘डबल इस्मार्ट’ या चित्रपटांचे विषय भिन्न असले तरी एका दिवशी प्रदर्शित होण्याचा फटका प्रत्येकाला बसणार असल्याचे चित्रपट व्यवसाय तज्ज्ञांचे मत आहे. रसिकांचा स्वातंत्र्यदिनाचा मूड पाहता 'वेदा'ला झुकते माप मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २'च्या मागे पहिल्या भागाच्या यशाची पुण्याई आहे. 'खेल खेल में'मधील स्टारकास्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधणारी आहे.

‘बाटला हाउस’ फेम दिग्दर्शक निखिल आडवाणी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'वेदा'चे लेखन असीम आझमी यांनी केले आहे. यात जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत आहेत. यापूर्वी स्वातंत्र्यदिनी रिलीज झालेल्या निखिल आणि जॉन या जोडीच्या ‘सत्यमेव जयते’ने जवळपास ११० कोटी रुपयांची कमाई केली होती.

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री’ या हॉरर-कॉमेडीचा 'स्त्री २' सिक्वेल आहे. या निमित्ताने पुन्हा श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराना एकत्र आले आहेत. सोबतीला ‘भेडिया’ वरुण धवनचा कॅमिओ आणि तमन्ना भाटियाचे स्पेशल साँगही आहे. हा चित्रपट अगोदर ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार होता.

'खेल खेल में' हे शीर्षक वाचताच १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या रवी टंडन यांच्या चित्रपटाची आठवण येते. अक्षय कुमार, तापसी पन्नू, वाणी कपूर, ॲमी विर्क, आदित्य सील, फरदीन खान यांनी ‘खेल खेल में’ या नावाने पुन्हा नवा डाव मांडला आहे. अगोदर हा चित्रपट ६ सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता. ‘हॅपी भाग जाएगी’ फेम मुदस्सीर अझीझ यांनी या कॉमेडी-ड्रामाचे दिग्दर्शन केले आहे.

'डबल इस्मार्ट' हा  मूळ तेलुगू भाषेत बनलेला चित्रपट हिंदी, कन्नड, मल्याळम, तमिळमध्ये प्रदर्शित होणार आहे. याचे लेखन-दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे. राम पोथिनेनीच्या जोडीला संजय दत्त बिग बुलच्या भूमिकेत आहे. याखेरीज काव्या थापर, सयाजी शिंदे, मकरंद देशपांडे आदी कलाकारही आहेत. हैदराबादमध्ये मुहूर्तानंतर मुंबईसह भारतातील इतर ठिकाणी व थायलंडमध्ये शूटिंग करण्यात आले आहे.

टॅग्स :बॉलिवूडस्वातंत्र्य दिन