Join us

नादखुळा! 'स्काय फोर्स'च्या प्रीमियर दरम्यान वीर पहारियाचा भन्नाट डान्स, 'Video' होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:38 IST

वीर पहारियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Veer Pahariya: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि वीर पहारिया (Veer Pahariyta) स्टारर 'स्काय फोर्स' हा सिनेमा २४ जानेवारी २०२५ या दिवशी जगभरात प्रदर्शित करण्यात आला. 'स्काय फोर्स' हा देशभक्तीपर सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित असून हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. चित्रपटाला सिनेरसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अक्षय कुमारसोबतच या चित्रपटात वीर पहारियाने केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. या सिनेमात सारा अली खान सुद्धा पाहायला मिळते आहे. दरम्यान, या चित्रपटाचं कथानक, कलाकारांच्या अभिनयासह त्यातील गाणीही लक्षवेधी ठरत आहेत. त्यातील 'रंग' हे गाणं देखील सध्या ट्रेंडिंगवर आहे. अशातच सोशल मीडियावर अभिनेता वीर पाहारियाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

'स्काय फोर्स'ने प्रदर्शनाच्या तारखेपासून बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली. त्यातच सोशल मीडियावर या चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यानचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता वीर पाहारिया प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या थिएटरमध्ये बेभान होऊन नाचताना दिसतो आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसतंय की, थिएटरमध्ये सगळे सिनेरसिक चित्रपट पाहण्यात मग्न असताना बॅकग्राउंडला सिनेमातील रंग गाणं वाजतंय. त्यावेळी वीर पाहारिया तिथे असलेल्या एका प्रेक्षक महिलेला बोलावतो आणि तिच्यासोबत बेभान होऊन डान्स करतो. वीरचा हा अंदाच पाहून चाहत्यांनी अभिनेत्याचं कौतुक करताना दिसत आहेत. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

'स्काय फोर्स' सिनेमा १९६५ च्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धादरम्यान पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यावर आधारित आहे. सध्या हिंदी सिनेसृष्टीत या चित्रपटाबद्दल चर्चा आहे. स्काय फोर्स सिनेमा प्रदर्शित होऊन तीन दिवस उलटले आहेत. शिवाय २०२५ मधील हा सर्वाधिक ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारसारा अली खानबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा