स्वातंत्र्यवीर विनायर दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांची संपूर्ण कथा उलगडणारी हिंदी वेबसिरीज लवकरच प्रदर्शित होत आहे. 'वीर सावरकर: सिक्रेट फाईल्स' (Veer Savarkar : secret files) असं सिरीजचं नाव आहे. सध्या स्वातंत्रयवीर सावरकरांवरुन राजकारण अनेकदा ढवळून निघत आहे. सावरकरांवर कॉंग्रेसकडून होणारी टीका, आरोप यामुळे नव्या वादांना तोंड फुटत आहे. पण या सगळ्या वादावर ही वेबसिरीज उत्तर असेल अशी प्रतिक्रिया सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिली आहे.
'वीर सावरकर : सिक्रेट फाईल्स'मध्ये मराठी अभिनेता सौरभ गौखले (Saurabh Gokhale) सावरकरांची भूमिका साकारत आहे. वेबसिरीजचं नवीन पोस्टर नुकतंच रिलीज झालं असून सौरभच्या लुकने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. काळा कोट आणि काळी पँटमध्ये सौरभ गौखले अगदी सावरकरांसारखाच दिसतोय. मागे एका झेंड्यावर 'वंदे मातरम' असं लिहिलेलं आहे. या पोस्टरने आता वेबसिरीजची उत्सुकता वाढवली आहे. सौरभ गौखलेने पोस्टर शेअर करत लिहिले, "मी विनायक दामोदर सावरकर. तात्याराव सावरकर...हिंदुहृदयसम्राट सावरकर...स्वातंत्र्यवीर सावरकर...हो माझ्यावर टीका करणाऱ्यांनुसार देशद्रोही सावरकर...देशद्रोही आणि सावरकर? मी माझ्याबद्दल जास्त बोललो नाही..आपल्याला कळत नाही पण वेळेची गती खूप तीव्र आहे...मोठमोठे साम्राज्य त्यासमोर ढेर झाले आहेत, इतिहास लुप्त होतो मग विनायक दामोदर सावरकर सारख्या सामान्य व्यक्तीची कथा कोण लक्षात ठेवेल. पण कथा कोणाएका व्यक्तीविशेषची नसते. त्या व्यक्तीला बनवणाऱ्या सामान्य असामान्य लोकांची असते. ज्या मातीत त्याचा जन्म झाला जिथे तो लहानाचा मोठा झाला त्या मातीचा इतिहास म्हणजे त्याचीच कथा आहे. माझी कथा सांगण्यापूर्वी मनात विचारांचं वादळ उठलं आहे. कसं सांगू माझ्या जीवनाची कथा? काय सांगू? आणि काय नाही सांगू? 'वीर सावरकर:सिक्रेट फाईल्स' लवकरच...
'वीर सावरकर' वेबसिरीजच्या घोषणेवेळी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर म्हणाले,"'स्वातंत्र्यवीर सावरकर या व्यक्तिमत्त्वाकडे मागील काही वर्षांपासून दुर्लक्ष झालेले आहे. त्यांनी अनेक क्रांतीकारकांना दिलेली प्रेरणा, एखाद्या विषयाबद्दल सावरकर यांची भूमिका काय होती, त्यांचा त्याग, बलिदान हे सर्व मांडण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. यामाध्यमातून ही भूमिका मांडण्याचं काम केलं जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सावरकर यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून टीकेला उत्तर दिले जाणार आहे. याशिवाय टीकेला उत्तर म्हणून काही बनवण्यापेक्षा आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेले स्वातंत्र्यवीर प्रेक्षकांसमोर आले पाहिजेत असा यामागचा मानस आहे."
'वीर सावरकर-सिक्रेट फाईल्स' ही वेबसिरीज पुढील वर्षी २६ फेब्रुवारी रोजी सावरकरांच्या पुण्यतिथीला प्रदर्शित होणार आहे. एकूण तीन भागांची ही सिरीज असणार आहे. वेबसिरीजचे दिग्दर्शन योगेश सोमण यांनी केलं आहे तर अनिर्बन सरकार यांनी निर्मिती केली आहे.