अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचे २७ मे रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओत वीरू देवगण आपल्या मुलाला म्हणजे अजयला अॅक्शन सीन शिकवत असताना दिसताहेत. व्हिडीओ बराच जुना आहे. कारण यात अजय बराच तरूण दिसतोय. या व्हिडीओत वीरू यांनी अनेक गोष्टींचा खुलासाही केला आहे. अजय जन्मला तेव्हाच त्याला हिरो बनवण्याचा निश्चय मी केला होता. कारण मी हिरो बनायला आलो होतो. पण मी हिरो बनू शकत नाही, याची जाणीव झाली आणि मी नाही तर माझा मुलगा नक्कीच हिरो बनेल, हे मी ठरवून टाकले, असे त्यांनी या व्हिडीओत सांगितले आहे.
माझे वडील रिअल सिंघम आहेत. कारण ते मुंबईत आलेत, तेव्हा त्यांच्या खिशात केवळ ४ रूपये होते. त्यांनी प्रचंड संघर्ष केला. आठ आठ दिवस उपाशी झोपलेत. एकदिवस रवी खन्ना यांनी त्यांना पाहिले आणि तू फाईट डायरेक्टर बनशील का, असा प्रश्न त्यांना केला. तिथून पुढे भारतातील सर्वात मोठा स्टंट डायरेक्टर बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास शानदार राहिला. मी जन्मलो तोपर्यंत त्यांच्याकडे पैसा, प्रसिद्धी सगळे काही होते. त्यांच्या डोक्यावर ५० टाके पडले होते. शरीरातील प्रत्येक हाड तुटले होते. त्यामुळेच त्यांच्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरा कुणीच सिंघम असू शकत नाही, असे अजयने सांगितले होते.