अजय देवगणचे वडिल वीरू देवगण यांचे आज (२७ मे) सकाळी हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले. वीरु देवगण यांनी लाल बादशहा, इश्क, क्रांती, जान, हकीगत यांसारख्या ८० हून जास्त चित्रपटांत अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केले. विशेष म्हणजे, अजय देवगणसारखा एक हरहुन्नरी सुपरस्टारही त्यांनी बॉलिवूड दिला. होय, अजय देवगण आज जो काही आहे, ते केवळ वडिल वीरू देवगण यांच्यामुळे.
अजय देवगणच्या जन्माआधीच आपल्या मुलाला अभिनेता बनवणार, हे वीरू देवगण यांनी ठरवले होते. याचे कारण म्हणजे, वीरू देवगण यांना स्वत:ला अभिनेता व्हायचे होते. हिरो बनण्यासाठी वीरू देवगण अमृतसरवरून पळून मुंबईला आले होते. पण त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
घरून पळून मुंबईत आलेल्या वीरू देवगण यांना मायानगरीत तगून राहण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. अगदी टॅक्सी स्वच्छ करण्यापासून तर कारपेन्टरचे काम करण्यापर्यंतची अनेक कामे त्यांनी केले. हे सगळे करण्यामागे त्यांचे एकच स्वप्न होते, ते म्हणजे हिरो बनण्याचे. अर्थात चॉकलेटी चेहरा नसल्याने त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळेच पहिला मुलगा होवा की मुलगी, त्यांना अभिनेता वा अभिनेत्री बनवणार, असे वीरू देवगण यांनी ठरवून टाकले होते. त्यांनी अजयला केवळ हिरो बनवले नाही तर सुपरस्टार बनवले.अजय देवगणला हिरो बनवण्याचाही प्रवासही सोपा नव्हता. फार लहान वयात वीरू यांनी अजयला फिल्ममेकिंग आणि अॅक्शनमधील बारकावे शिकवले. तो थोडा मोठा झाल्यावर डान्स क्लास, हॉर्स रायडिंग, जिम ट्रेनिंग असे सगळे त्याच्याकडून करवून घेतले. अजयला ऊर्दूही शिकवली. पित्याची ही मेहनत फळली आणि १८ व्या वर्षी ‘फुल और कांटे’मधून अजयने डेब्यू केला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.
वीरु यांनी क्रांती, सौरभ, सिंहासन यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्यांनी हिंदुस्थान की कसम या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासोबतच या चित्रपटाची निर्मिती केली होती. तसेच दिल क्या करे या चित्रपटाचे निमार्ते देखील तेच होते.
वीरु देवगण यांच्या पश्चात चार मुले असून अभिनेता अजय देगगण हा त्यांचा मुलगा आहे. अभिनेत्री काजोल ही त्यांची सून असून अजय आणि काजोलसोबत अनेकवेळा सार्वजनिक कार्यक्रमात ते हजेरी लावत.