Join us

'शौर्य गाथेचा भाग बनणं खूप अभिमानास्पद', शरद केळकरनं जागवल्या 'तान्हाजी'च्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 4:40 PM

शरद केळकरने 'तान्हाजी:द अनसंग वॉरियर' चित्रपटातील फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.

अभिनेता शरद केळकर हा चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावंत आणि हरहुन्नरी कलाकार आहे. आपला सहज सुंदर अभिनय आणि एकसे बढकर एक सिनेमांमुळे आपली छाप रसिकांवर पाडली आहे. लक्ष्मी सिनेमात शरदच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. अक्षय कुमार हिरो असलेला लक्ष्मी सिनेमात शरद केळकरनेच रसिकांची सर्वाधिक पसंती मिळवली आहे. या चित्रपटापूर्वी शरद केळकरने 'तान्हाजी:द अनसंग वॉरियर' या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. ही भूमिकादेखील शरदने उत्तम साकारली होती. नुकतेच या चित्रपटाला एक वर्षे पूर्ण झालेत. या निमित्ताने सोशल मीडियावर शरद केळकरने या चित्रपटातील त्याचे फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.

शरद केळकरने इंस्टाग्रामवर 'तान्हाजी:द अनसंग वॉरियर' चित्रपटातील फोटो शेअर करत लिहिले की, हया शौर्य गाथेचा भाग बनणे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडदयावर जगणे हे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे! आपण सर्वांनी जे प्रेम दिले त्यासाठी मी ह्रदयापासुन धन्यवाद व्यक्त करतो.

शरदच्या या फोटोवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तान्हाजी: द अनसंग वॉरियर या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. या चित्रपटामध्ये तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची कथा रेखाटण्यात आली होती.

शरद केळकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याने आतापर्यंत लय भारी, मोहेंजोदारो, लक्ष्मी, सरदार गब्बर सिंह, भूमि, राक्षस, रामलीला या चित्रपटात काम केले आहे. तसेच बऱ्याच वेब सीरिज आणि मालिकांमध्येही शरदने काम केले आहे.

टॅग्स :शरद केळकरतानाजी