ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांचे धाकटे बंधू असलम खान यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. असलम यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने मुंबई मध्ये वांद्रे परिसरातील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांना मधुमेह, हायपर टेंशन, हृदयासंबंधीत समस्या होती, अशी माहिती रूग्णालयाकडून देण्यात आली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर अशा दीर्घकालीन आजार असलेल्यांमध्ये आजाराची गुंतागुंत अधिक वाढते. असलम यांना देखील को-मॉर्बिडीटीचा त्रास असल्यामुळे सुरूवातीपासूनच धोका अधिक होता. मागील काही दिवसांपासून असलम खान यांची प्रकृती चिंताजनक होती. उपचारा दरम्यान त्यांचे आज सकाळी निधन झाले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, असलम खान यांच्या सोबतच त्यांचे बंधू इशान खान यांनादेखील कोरोनाची लागण झाल्यामुळे रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांची देखील प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.