Join us

Girish Karnad: ज्येष्ठ लेखक, अभिनेते गिरीश कर्नाड यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 9:41 AM

कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांचं निधन झालं आहे.

बंगळुरूः  कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांचं निधन झालं आहे. प्रदीर्घ आजारानं वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बंगळुरूतील निवासस्थानी गिरीश कर्नाड यांची प्राणज्योत मालवली. मराठी चित्रपट 'उंबरठा'मध्येही त्यांनी भूमिका साकारली होती. पद्मश्री, पद्मभूषण आणि ज्ञानपीठ पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. तुघलक, नागमंडल, हयवदन या मराठी नाटकांचं त्यांनी दिग्दर्शन केलं. गिरीश कर्नाड यांचा जन्म 19 मे 1938 रोजी माथेरान येथील एका कोकणी कुटुंबात झाला. कर्नाड यांचे मूळगाव कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील ‘कार्नाड’ हे आहे. वडील रघुनाथ कर्नाड हे नावाजलेले डॉक्टर होते. आई कृष्णाबाई ऊर्फ कुट्टाक्का-बालविधवा असलेल्या त्यांनी डॉ. कर्नाडांशी विवाह केल्यानंतर सामाजिक टीका झाली. गिरीश कर्नाड यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. गणित आणि संख्याशास्त्र हे विषय घेऊन कर्नाड प्रथम श्रेणीत बीए उत्तीर्ण झाले. त्यावेळेस बालगंधर्व, किर्लोस्कर नाटक कंपन्यांच्या नाटकांचे त्यांच्यावर संस्कार झाले. त्यांचे उच्च शिक्षण लिंकन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे झाले. कर्नाड हे शिकागो विद्यापीठाचे हंगामी प्राध्यापक आणि फुलब्राइट विद्वान होते. त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वतःला झोकून दिले. प्रतिष्ठित ऱ्होडस शिष्यवृत्ती मिळवून ऑक्सफर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांत 1963मध्ये त्यांनी पदवी मिळवली. त्यानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमध्येच काही काळ काम केल्यानंतर ते मद्रास येथील कचेरीत कार्यरत झाले.गिरीश कर्नाड यांनी चित्रपटसृष्टीत वंशवृक्ष या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. गिरीश कर्नाड यांचा हा चित्रपट एस. एल. भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. कर्नाड यांनी संस्कार या प्रायोगिक चित्रपटातही काम केले होते. नंतर कर्नाड यांनी बऱ्याच कन्नड आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले.कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेला ‘उत्सव’ आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. हिंदी, मल्याळम, तेलुगू, तमीळ, मराठी अशा 70हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. 1982मध्ये जब्बार पटेल दिग्दर्शित ‘उंबरठा’ चित्रपटामध्ये अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या पतीची त्यांनी केलेली भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली. गिरीश कर्नाड यांनी आपल्या नाटकात पौराणिक, ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या माध्यमातून आधुनिक आशय व्यक्त केला.सोशिकता ही नाटकांतील स्त्री व्यक्तिरेखांची परंपरा त्यांनी मोडली. त्यांच्या नाटकांतील स्त्री व्यक्तिरेखा डिमांडिंग आहेत. कर्नाड यांनी आपल्या नाटकात केलेली पारंपरिक मांडणी, आशय यांची पुनर्मांडणी अद्भुत आहे. कन्नड आणि इंग्रजी भाषेत लिखाण केले असूनही त्यांनी नेहमी स्वत:ला मराठी संस्कृतीशी जोडून ठेवले.

टॅग्स :गिरिश कर्नाड