मुंबई: बॉलिवूडमधील प्रख्यात गायक आणि गझलकार भूपिंदर सिंग (Bhupinder Singh) यांचे सोमवारी वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. पत्नी मिताली सिंग यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून आजारी होते, त्यांना युरिनरी इन्फेक्शनही झाले होते. अखेर सोमवारी मुंबईत त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
गायक भूपिंदर सिंग यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1940 रोजी अमृतसर येथे झाला. वडील नत्था सिंग यांच्याकडून त्यांना संगीताचे शिक्षण मिळाले. करिअरच्या सुरुवातीला भूपिंदर सिंग दिल्लीच्या ऑल इंडिया रेडिओवर कार्यक्रम करत होते. गिटार आणि व्हायोलिन वाजवायलाही ते शिकले होते. याचबरोबर बॉलिवूडमधील नावाजलेले गायक होते. त्यांच्या नावावर अनेक हिट गाणी आहेत. त्यांनी गायलेल्या गझलमुळे त्यांना एक विशेष ओळख मिळाली.
भूपिंदर सिंग यांची 'मेरा रंग दे बसंती चोला', 'प्यार हमें किस मोड़ पर ले आया', 'हुजूर इस कदर', 'एक अकेला इस शहर में', 'जिंदगी मिलके बिताएंगे', 'बीती ना बितायी रैना', 'नाम गुम जाएगा' सारखी त्यांची सर्व गाणी खूप लोकप्रिय झाली. तसेच, त्यांच्या पत्नी मिताली सिंग यादेखील प्रख्यात गायिका आहेत. पत्नी मिताली यांच्यासोबत त्यांनी गझल गायनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत.
भूपिंदर सिंग यांनी गायलेली प्रसिद्ध गाणी
- चुरा लिया है तुमने जो दिल को - दम मारो दम- महबूबा-महबूबा- दिल ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन - एक अकेला इस शहर में रात में और दोपहर में- नाम गुम जाएगा- करोगे याद तो - मीठे बोल बोले - किसी नजर को तेरा इंतजार- कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता