सुप्रसिद्ध दिग्दर्शक, नाटककार, हिंदी-उर्दू लेखक सागर सरहदी यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. त्यांच्या निधनावर बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी दु:ख व्यक्त केले आहे.सागर सरहदी हे दीर्घकाळापासून आजारी होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अन्नपाणी सोडले होते. त्यांना हृदयाशी संबंधित समस्या होती. याआधी 2018 साली त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. नूरी, कभी कभी, सिलसिला, चांदनी, कहो ना प्यार है या सिनेमांसाठी सागर सरहदी ओळखले जातात. या चित्रपटांच्या पटकथा त्यांनीच लिहिल्या होत्या.
सागर सरहदी यांचे खरे नाव गंगा सागर तलवार होते. सध्या पाकिस्तानात असलेल्या Baffa येथे येथे त्यांचा जन्म झाला. प्रारंभी ऊर्दू लघूकथा लिहणा-या सागर सरहदी यांनी नंतर नाट्यलेखन सुरु केले. 1976 मध्ये सागर सरहदी यांनी यश चोप्रा यांच्या ‘कभी कभी’ या सिनेमाची पटकथा व संवाद लिहिले. या सिनेमाने त्यांना खरी ओळख दिली. यानंतर नूरी, सिलसिला, चांदनी, दीवाना अशा अनेक सिनेमांच्या पटकथा व संवाद त्यांनी लिहिले.
पुढे त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही नशीब आजमावले. स्मिता पाटील, फारूख शेख व नसीरूद्दीन शाह यांच्या अभिनयाने सजलेला ‘बाजार’ हा सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केला होता. हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ या सिनेमात हृतिकचे संवाद सागर सरहदी यांनीच लिहिले होते.