Join us

Pathan Controversy: "शाहरुखनं खरंतर माफी मागायला हवी, पण तो तर...", ‘पठाण’ वादात आता विश्व हिंदू परिषदेची उडी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 5:01 PM

Shahrukh Khan, VHP : बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकिनीवरून वातावरण तापलं असताना आता विश्व हिंदू परिषदेनंही या वादात उडी घेतली आहे.

Besharam Rang Controversy: किंगखान शाहरूख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) या आगामी सिनेमानं रिलीजआधीच वाद ओढवून घेतला आहे. या सिनेमाच ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज झालं आणि या गाण्यात दीपिका पादुकोणने घातलेल्या भगव्या बिकिनीवरून वातावरण तापलं. अनेक हिंदू संघटनांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असताना आता विश्व हिंदू परिषदेनंही या वादात उडी घेतली आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्यासाठी शाहरूखनं जाहिर माफी मागावी, अन्यथा त्याचा सिनेमा रिलीज होऊ देणार नाही, अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेनं घेतली आहे.

‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे. यावर हिंदू संघटनांचा आक्षेप आहे.  विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली होती. ‘भगव्याला बेशरम सांगत आक्षेपार्ह, अश्लिल नाचणं हे हिंदूविरोधी मानसिकतेचा कळस आहे, ’असं ते म्हणाले होते. आता विश्व हिंदू परिषदेचे जॉइंट सेक्रेटरी सुरेंद्र जैन यांनी यानिमित्ताने शाहरूखवर निशाणा साधला आहे.

काल कोलकाता फिल्म फेस्टिवलमध्ये शाहरूख सोशल मीडियावरच्या नकारात्मकतेवर भाष्य करत, अप्रत्यक्षणपणे ‘पठान’वादावर बोलला होता. शाहरूखच्या या भाषणावर पलटवार करत सुरेंद्र जैन यांनी जळजळीत प्रतिक्रिया नोंदवली आहे. ‘खरं तर शाहरूखने माफी मागायला हवी. पण तो तर उद्धटपणे बोलतोय. भारताचा सोशल मीडिया संकुचित मानसिकतेचा आहे, असं काल तो कोलकात्यात म्हणाला. शाहरूखने माफी मागावी. तो माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही. भगव्या रंगाला ‘बेशरम रंग’ या गाण्याशी जोडून शाहरूखच्या पठान या सिनेमाने हिंदू धर्म व संपूर्ण भारताचा अपमान केला आहे, असं जैन म्हणाले.

काय म्हणाला होता शाहरूख?

‘बेशरम रंग’ या गाण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शाहरूख खान यानेही प्रतिक्रिया दिली आहे. ‘सोशल मिडीया हे माध्यम बऱ्याचदा विशिष्ट संकुचित दृष्टीकोनातून चालवले जाते. मी कुठेतरी वाचलं आहे की नकारात्मकता सोशल मीडियाचा वापर वाढवते. अशा प्रयत्नांमुळे समाजात फूट पडते आणि यातून विध्वंसच घडतो.  अर्थात जगाता काहीही सुरू असो फरक पडत नाही, आमच्यासारखे लोक सकारात्मक राहतील, ’ असं शाहरूख म्हणाला. कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो बोलत होता.

टॅग्स :शाहरुख खानपठाण सिनेमाबॉलिवूड