अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) याचे नाव बॉलिडमधील आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत सामाविष्ट आहे. विकीने आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. एकाहून एक सरस सिनेमे त्याने दिले आहेत. आज विकी हा यशाच्या शिखरावर आहे. पण, तुम्हाला माहितेय का अभिनयात येण्यापुर्वी विकी कोशलने 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटासाठी अनुराग कश्यप यांचा असिस्टंट म्हणून काम केलं होतं. यावेळी विकी हा वाळू माफियांच्या हातून मार खाण्यापासून थोडक्यात बचावला होता. काय आहे तो किस्सा जाणून घेऊया.
सध्या विकी कौशल हा त्याच्या 'बॅड न्यूज' या सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी विकी विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. नुकतेच विकीनं तन्मय भट याच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिलेल्या मुलाखतीमध्ये 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही किस्से सांगितले. तो म्हणाला, चित्रपटात वाळू तस्करीचा सीन शूट करायचा होता. त्यावेळी आमच्यासोबत एक घटना घडली होती. जेव्हा आम्ही तो सीन शूट करण्यासाठी गेलो, तेथील दृश्य पाहिल्यानंतर मी चकित झालो, कारण तिथे फक्त दोन ट्रक नव्हते, तर ५०० ट्रक होते. ते पाहिल्यावर तुम्हाला असे वाटणारच नाही की, हे बेकायदेशीररित्या चालू आहे, इतक्या उघडपणे वाळू तस्करी चालू होती'.
पुढे त्याने सांगितलं, 'आम्ही गुपितपणे तो सीन शूट करत होतो आणि तेवढ्यात काही लोक आमच्याजवळ आले. ५०० लोकांनी आम्हाला वेढा घातला होता. जो कॅमेरामॅन होता, त्याचे वय ५० पेक्षा जास्त होते. कॅमेरा वेळेत पोहचू शकत नाही, आम्ही अडकलो आहे, हे सांगण्यासाठी त्याने युनिटला फोन केला. त्याचे फोनवरील बोलणे ऐकून एका माणसाला वाटले आम्ही कोणालातरी बोलावण्यासाठी फोन केला आहे आणि कॅमेरामॅनला कानाखाली मारली. त्यानंतर त्यांनी कॅमेरा हिसकावून घेतला आणि कॅमेरा फोडून टाकेन अशी धमकी द्यायला सुरूवात केली. आम्ही त्यादिवशी वाळमाफियांकडून मार खाल्ला असता मात्र तिथून कसेतरी निसटलो'.