Chhaava Box Office Collection:विकी कौशलच्या (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava) सिनेमाने काल थिएटरमध्ये धडक दिली. सकाळी ६ च्या शोपासूनच काल प्रेक्षकांची गर्दी उसळली होती. थिएटरमधून आल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. 'छावा' मधून विकी प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचला आहे. त्याचा स्क्रीन प्रेझेन्स, छत्रपती संभाजी महाराजांचा लूक, त्यांची भूमिका सगळंच त्याने अप्रतिमरित्या निभावलं आहे अशीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली. 'छावा' ने पहिल्या दिवशी बक्कळ कमाईही केली आहे.
१४ फेब्रुवारी रोजी 'छावा' रिलीज झाला. सिनेमामुळे बॉक्सऑफिसवर वादळच आलं. ट्रेड रिपोर्टनुसार 'छावा'ची अॅडव्हान्स बुकिंगच भरघोस झाली होती. यासोबतच सिनेमाने पहिल्या दिवशीच तब्बल ३१ कोटींचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा विकी कौशलचा 'छावा' हा पहिलाच सिनेमा आहे. यापूर्वी त्याच्या 'उरी' आणि 'बॅड न्यूज' ने ९ आणि ८ कोटींची कमाई केली होती. ज्याप्रकारे 'छावा'ला प्रतिसाद मिळतोय त्यावरुन सिनेमा येत्या काही दिवसात अनेक रेकॉर्ड मोडेल अशी शक्यता आहे.
सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्येच ५ लाख तिकीट विकले गेले होते. यातूनच १३.७० कोटी कमाई झाली होती. सिनेमाचं बजेट १३० कोटी आहे. २०२५ वर्षाची 'छावा'ने बॉलिवूडला दमदार सुरुवात करुन दिली आहे. लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा'चं दिग्दर्शन केलं असून सिनेमात रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, डायना पेंटी यांचीही भूमिका आहे. मॅडॉक फिल्म्स बॅनरअंतर्गत दिनेश विजान यांनी निर्मिती केली आहे.