'छावा' सिनेमा हा २०२४ मध्ये बहुचर्चित सिनेमा म्हणून ओळखला जात होता. हा सिनेमा ६ डिसेंबरला रिलीज होणार होता. परंतु 'पुष्पा 2'मुळे 'छावा'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलीय. 'छावा' नेमका कधी रिलीज होणार याविषयी अनेक चर्चा सुरु होत्या. अखेर याबद्दल मोठी अपडेट समोर आलीय. 'छावा' सिनेमाच्या रिलीजचा मार्ग मोकळा झाला असून विकीचा 'छावा' २०२५ मध्ये एका खास दिवशी रिलीज होणार आहे.
या खास दिवशी रिलीज होणार 'छावा'
'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज होणार आहे. १४ फेब्रुवारी हा दिवस निवडण्यामागे निर्मात्यांनी खास शक्कल लढवली आहे. ती म्हणजे 'छावा' सिनेमाच्या रिलीजनंतर काहीच दिवसांनी म्हणजेच १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. या खास दिनाचं औचित्य साधून निर्मात्यांनी 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारीला रिलीज करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सिनेमाला नक्कीच याचा फायदा होईल.
'छावा' सिनेमाबद्दल सांगायचं तर..
गेल्या अनेक महिन्यांपासून 'छावा' हा बॉलिवूडमधील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा म्हणून ओळखला जातोय. 'छावा' सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. याशिवाय या सिनेमात रश्मिका मंदाना येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही सिनेमात विशेष भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमात आणखी कोणते कलाकार दिसणार, याविषयीची माहिती लवकरच समोर येईल. दरम्यान सर्वांना आता १४ फेब्रुवारीची उत्सुकता आहे.