सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. त्यामुळे काहीही महत्त्वाचे कारण असेल तरच लोकांनी घराच्या बाहेर पडावे असे सगळ्यांना सरकारने सांगितले आहे. लोकांनी घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन सेलिब्रेटी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत. पण विकी कौशलने लॉकडाऊनचा नियम मोडला असून यामुळे त्याला अटक करण्यात असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. पण या सगळ्या केवळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण विकीने दिले आहे.
विकी कौशलला लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यामुळे अटक करण्यात आली अशा पोस्ट सोशल मीडियावर काल व्हायरल झाल्या होत्या. पण आता विकीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मी लॉकडाऊनचे नियम मोडल्यामुळे मला अटक करण्यात आली अशा काही पोस्ट मी सोशल मीडियावर पाहिल्या आहेत. पण खरं सांगू तर लॉकडाऊन घोषित झाल्यापासून मी घराच्या बाहेर देखील पडलेलो नाही. लोकांना माझी विनंती आहे की, कोणीही अशाप्रकारच्या अफवा पसरवू नयेत... विकीने ट्विटरवर ही पोस्ट टाकली असून या पोस्टसोबत त्याने मुंबई पोलिसांना देखील टॅग केले आहे.
कोरोनाच्या संकटासोबत लढण्यासाठी अनेक कलाकारांनी आपापल्या परिने आर्थिक मदत केली आहे. विकी कौशलने पंतप्रधान सहाय्यक निधीत एक कोटी रुपयांची मदत केली असून त्यानेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट सांगितली होती. त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती आणि त्यात लिहिले होते की, मी खूपच भाग्यवान आहे की, सध्या मी माझ्या कुटुंबियांसोबत माझ्या घरात वेळ घालवत आहे. पण माझ्यासारखे सगळेच भाग्यवान नसतात. या अतिशय वाईट काळात मी माझ्याकडून पंतप्रधान सहाय्यक निधीला आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला मिळून एक करोड रुपये देत आहे. आपण सगळ्यांनी मिळून या संकटाचा सामना करूया...