विकी कौशलचे (Vicky Kaushal) वडील शाम कौशल (Sham Kaushal) यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एक मोठा खुलासा केला आहे. शाम यांनी मुलाखतीत सांगितले की, त्यांना 20 वर्षांपूर्वी कॅन्सर झाला होता. त्यांची प्रकृतीही इतकी बिघडली होती की डॉक्टरांनी त्यांना जगणार नाहीत असं सांगितलं होतं. विकी आणि सनी त्यावेळी खूपच लहान होते. मात्र 50 दिवस रुग्णालयात दाखल केल्यानंतर शाम कौशल यांनी कॅन्सरवर मात केली होती.
शाम कौशल यांनी राजश्री अनप्लग्डसोबतच्या संवादादरम्यान याचा खुलासा केला. शाम कौशल म्हणाले, "2003 साली कॅन्सर झाला होता. फरहान अख्तरच्या 'लक्ष्य' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पोटात समस्या निर्माण झाली होती. तपासणी केली असता कॅन्सर असल्याचे कळले. तब्येत इतकी बिघडली होती की तुम्ही जगू शकणार नाही असं डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले होते."
"मी माझ्या आयुष्यात शून्यापासून सुरुवात केली"
यासोबतच शाम कौशल म्हणाले, "त्यावेळी मी जगणार नाही हे मान्य केलं होतं. म्हणूनच मी देवाकडे प्रार्थना केली की मी दुःखी नाही. मी 48 वर्षांचा आहे. मी माझ्या आयुष्यात शून्यापासून सुरुवात केली आणि काही वेळात खूप काही मिळवले. मला इथून घेऊन जा जर तुम्हाला मला वाचवायचे असेल तर मला दुर्बल माणसासारखे जिवंत ठेवू नका."
"विकी 15 वर्षांचा आणि सनी 14 वर्षांचा होता"
शाम यांना कॅन्सरच्या उपचारादरम्यान सुमारे 50 दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शाम कॅन्सरशी झुंज देत असताना विकी आणि सनी खूपच लहान होते. विकी 15 वर्षांचा आणि सनी 14 वर्षांचा होता. विक्की कौशलचे वडील शाम कौशल हे प्रसिद्ध एक्शन डायरेक्टर आहेत. 'पीके' आणि 'पद्मावत' सारख्या अनेक चित्रपटात काम केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.