उरी फेम अभिनेता विकी कौशलने 'मसान' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या. त्याच्या सगळ्याच चित्रपटातील भूमिकांनी रसिकांच्या मनावर छाप उमटवली आहे.
रमण राघव, मनमर्जिया, संजू, राझी आणि उरीः द सर्जिकल स्ट्राईक या सगळ्याच विकीच्या भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. त्याचे चित्रपट तिकिटबारीवर देखील यशस्वी ठरले आहेत. विकी कौशलने बॉलिवूडमध्ये आज आपले प्रस्थ निर्माण केले आहे. पण विकीसाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याचे वडील शाम कौशल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध ॲक्शन डायरेक्टर असले तरी विकीने त्याच्या स्वतःच्या मेहनतीवर बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे.
विकीचे बालपण एका चाळीत गेले. मालाडमध्ये 10 बाय 10 च्या घरात तो राहात होता. याविषयी त्यानेच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. त्याने म्हटले होते की, माझे वडील हे स्टंटमॅन होते. माझा जन्म झाला त्यावेळी देखील ते चित्रीकरणासाठी मुंबईच्या बाहेर होते. मला पहिल्यांदा पाहिल्यानंतर ते प्रचंड खूश झाले होते. मी लहानपणापासून अभ्यासात हुशार होतो. त्याचसोबत शाळेतील विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. मी शालेय जीवनापासून चांगला अभिनय आणि डान्स करत असलो तरी मी अभिनेता बनण्याचे कधीच ठरवले नव्हते. माझे वडील शूटवर जायचे, त्यावेळी तुम्ही मला पण घेऊन जा... मला तुमच्या चित्रपटातील नायकाला भेटायचे आहे असे मी त्यांना सांगायचो. माझ्या घरात फिल्मी वातावरण नव्हते आणि आम्ही चित्रपटांविषयी घरी चर्चा देखील करायचो नाही. माझे वडील इंडस्ट्रीतील असले तरी माझे बालपण हे एखाद्या सामान्य मुलाप्रमाणे होते.