हिंदी सिनेमा 'छावा' (Chhaava) उद्या सगळीकडे रिलीज होत आहे. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत आहे. मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. अगदी भव्यदिव्य असा हा सिनेमा आहे म्हटल्यावर याचं संगीतही जबरदस्त आहे. खुद्द ए आर रहमान यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. कालच सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा पार पडला. यावेळी विकी कौशलने ए आर रहमानसमोर भावना मांडल्या.
काल झालेल्या 'छावा' च्या म्युझिक लाँच सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. ऑस्कर विजेते ए आर रहमान यांना सर्वांनी याची देही याचि डोळा परफॉर्म करताना पाहिले. नंतर स्टेजवर रहमान पियानो वाजवत होते तर समोर विकी कौशल होता. तो म्हणाला, "रहमान सरांसमोर नुसतं बोलायलाही मला भीती वाटत आहे. छावा सिनेमातील डायलॉग्स आज मी त्यांच्यासमोर परफॉर्म करणं यापेक्षा चांगलं काही असू शकत नाही." यानंतर विकीने सिनेमातील डायलॉग्स ऐकवले आणि रहमान यांनी पियानोवर म्युझिक वाजवत माहोल तयार केला.
विकी रहमान यांचा मोठा चाहता आहे. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीतही तो म्हणाला होता की, "माझं नेहमीच एक स्वप्न होतं की मी असा सिनेमा करावा ज्याच्यासोबत म्युझिक बाय ए आर रहमान असं जोडलं गेलं असेल. ते स्वप्न माझं या सिनेमामुळे पूर्ण झालं. ए आर रहमान महान आहेत. मी बऱ्याचदा लक्ष्मण सरांच्या मागे लागलो की मला ए आर रहमान यांना भेटायचंय. भेट करुन द्या ना. आता मी त्यांना लवकरच भेटणार आहे. हे खरंच स्वप्न सत्यात उतरणारं आहे."
'छावा' उद्या १४ फेब्रुवारी रोजी सगळीकडे रिलीज होत आहे. सिनेमाची चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. विकी कौशलचा परफॉर्मन्स ट्रेलरमध्येच एवढा दमदार वाटला की सिनेमा तर कसा असेल याची सर्वांना प्रतिक्षा आहे.