सध्या थिएटरमध्ये 'छावा' (Chhaava) चं वादळ आलं आहे. विकी कौशलची (Vicky Kaushal) गर्जना ऐकू येत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या लूकमध्ये तो शोभून दिसतोय. त्याने भूमिका अक्षरश: जगली आहे. थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहून सर्वचजण भारावले आहेत. अगदी लहान मुलांच्या डोळ्यातही पाणी आलं आहे. असाच एक चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये सिनेमा संपल्यावर तो गर्जना करताना दिसतोय. विकीने त्या चिमुकल्याचा व्हिडिओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे.
सोशल मीडियावरील हा व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल. ५-६ वर्षांचा हा चिमुकला 'छावा'पाहून अक्षरश: ढसाढसा रडताना दिसतोय. इतकंच नाही तर सिनेमाच्या शेवटी रडतच तो छातीवर हात ठेवून गर्जनाही करत आहे. यातून त्याने शिवरायांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना दिली आहे. हे पाहून सगळेच भावुक झालेत. विकीने हाच व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिले, "आमची सर्वात मोठी कमाई!बेटा, तुझा अभिमान वाटतो. तुला मिठी मारावी वाटतीये. तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि भावनेबद्दल खूप खूप आभार. जगाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक घरात शंभूराजांची कहाणी पोहोचावी ही आमची इच्छा होती. हे सत्यात उतरताना पाहून जिंकल्यासारखं वाटतंय."
विकीच्या या पोस्टवर अनेकांनी भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत. आज जगभरात विकीचा 'छावा' पोहोचला आहे. त्याने अक्षरश: जीव ओतून काम केलं आहे. तर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांचंही विशेष कौतुक होत आहे. अक्षय खन्नाने औरंगजेबाच्या भूमिकेतून छाप पाडलीये. इतर सर्वच कलाकारांनी लक्षात राहणाऱ्या भूमिका निभावल्या आहेत. 'छावा'ने तीनच दिवसात १०० कोटींची कमाई करत सिनेमाचं बजेटच वसूल केलंय.