मागील काही दिवसांपूर्वी करण जोहरने त्याच्या घरी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत बॉलिवूडचे बरेच तारेतारकांनी हजेरी लावली होती. यात रणबीर कपूर, विकी कौशल, शाहिद कपूर, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, दीपिका पादुकोण व वरूण धवन उपस्थित होते. या पार्टीतील एक व्हिडिओ करण जोहरने सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर या पार्टीतील कलाकारांवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप होऊ लागला. त्यानंतर यावर काही सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिली. आता पुन्हा एकदा विकी कौशलने त्या पार्टीतील रात्रीतील सत्य सांगत संताप व्यक्त केला.
विकी कौशलने एका मुलाखतीत सांगितलं की, जेव्हा या पार्टीतील एक व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी मला अरूणाचल प्रदेश जायचे होते. मी इंडियन आर्मीसोबत तिथल्या डोंगरावर होतो. तिथे अजिबात नेटवर्क नव्हते. मला अजिबात माहित नव्हते की मी संपूर्ण देशाचा चरसी बनलो आहे.
विकीने पुढे सांगितलं की, मी जेव्हा मुंबईत परतलो तेव्हा मी माझं ट्विटर अकाउंट चेक केलं. एफआयआर, ओपन लेटर? मला वाटलं की माझ्या आई वडिलांवर याचा खूप परिणाम होईल. ते न्यूज फॉलो करत होते. मी माझ्या आई वडिलांजवळ गेलो तर ते हसत होते.
तो पुढे म्हणाला की, मला वाटलं की सर्व काही ठीक आहे. कारण माझ्या आई वडिलांना सर्व माहित आहे. मात्र काही टीव्ही चॅनेलवर माझ्याबद्दल काहीही बोलत होते. या गोष्टी मला खूप प्रभावित करत होत्या.
पत्रकार राजीव मसंद यांच्या शोमध्ये करण ही पार्टी आणि त्याच्या व्हिडीओवर बोलला. ‘त्या दिवशी पार्टीत अनेक स्टार्स हजर होते. या सर्वांनी प्रचंड कष्टाने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. आठवडाभर काम केल्यानंतर हे सगळेजण एन्जॉय करत होते. पार्टीत ड्रग्ज असती तर मी हा व्हिडीओ शेअर केला असता का? मी इतका मूर्ख नक्कीच नाही,’असे करण म्हणाला. विकी कौशल नाक स्वच्छ करताना दिसला म्हणजे त्याचा अर्थ तो ड्रग्ज घेत होता, असा होतो का? एखादी व्यक्ती आपला फोन खिशात टाकत असेल तर तो ड्रग्ज लपवत असेल असा अर्थ निघतो का? असे सवालही करणने यावेळी केले.
‘लाईटच्या रिफ्लेक्शन पडले आणि लोकांनी त्याला ड्रग्ज ठरवले. विकी कौशल त्यावेळी डेंग्यूच्या आजारातून बरा होत होता. तो गरम पाणी आणि लिंबू घेत होता. व्हिडीओ बनवण्याच्या 5 मिनिटांआधीपर्यंत माझी आई त्यादिवशी तिथे हजर होती. माझ्या कुटुंबात फक्त आणि फक्त आनंद वाटला जातो. मित्रांसोबत बसून गप्पा केल्या जातात, चांगले संगीत ऐकले जाते. आम्ही त्यादिवशी वेगवेगळ्या पक्वानांचा आस्वाद घेतला, मस्ती केली, इतकेच, असेही करण म्हणाला.
या आरोपांवर तू शांत का बसलात? असे विचारले असता, अशा व्यर्थ गोष्टींवर खुलासे देणे मी सोडले आहे. पण यापुढे असे आरोप झालेच तर मी कायदेशीर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही. तुम्हाला वाटते म्हणून तुम्ही आमची प्रतिष्ठा धुळीस मिळवू शकत नाही, असे त्याने सांगितले.