विकी कौशलच्या (Vicky Kaushal) 'तौबा तौबा' (Tauba Tauba) गाण्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ठेका धरायला लावला. त्याच्या आगामी 'बॅड न्यूज' सिनेमातलं हे गाणं चांगलंच व्हायरल होतंय. विकीच्या डान्स स्टेप्सने लोकांना वेड लावलं आहे. कोरिओग्राफर बॉस्को मार्टिसने (Bosco Martis) हा डान्स बसवला आहे. आता नुकतंच बॉस्कोने सगळं श्रेय विकीलाच मिळत असल्याची खंत व्यक्त केली. यावर विकीचीही प्रतिक्रिया आली आहे.
विकी कौशलने 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत कोरिओग्राफर बॉस्को मार्टिसच्या वक्तव्याला पाठिंबा दिला. तो म्हणाला, "मी त्या स्टेप्स घरुन तर शिकून आलो नव्हतो ना. बॉस्कोनेच मला डान्स शिकवला. कॅमेऱ्यामागे असलेला प्रत्येक व्यक्ती हा खरा हिरो आहे. कॅमेऱ्यासमोर जे घडत आहे त्यामागे याच लोकांची मेहनत असते. आम्ही कॅमेऱ्यासमोर दिसतो त्यामुळे जी वाहवाही व्हायची ती आमचीच होते आणि जर चप्पल पडल्या तर त्याही आमच्यावरच पडतात."
तो पुढे म्हणाला, "खरे हिरो तर तेच आहेत. एक सिनेमा बनवण्यासाठी मागे संपूर्ण आर्मी असते. ३०० लोकांचे कष्ट यामागे असतात. फक्त आमचीच वाहवाही न होता तितकीच त्यांचीही स्तुती झाली पाहिजे. मी याच्याशी १०० टक्के सहमत आहे."
विकी कौशलचा 'बॅड न्यूज' येत्या 19 जुलै रोजी रिलीज होत आहे. यामध्ये तृप्ती डिमरी आणि एमी विर्कही मुख्य भूमिकेत आहेत. तृप्ती आणि विकीच्या हॉट केमिस्ट्रीची सध्या बी टाऊनमध्ये चर्चा आहे.