बॉक्स ऑफिसवर सध्या बॉलिवूड सिनेमांचा दबदबा पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक चित्रपट सुपरहिट ठरत आहेत. 'पठाण', 'गदर २', 'जवान', 'ड्रीम गर्ल २'नंतर आता विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरपासून चाहत्यांना सिनेमाबाबत उत्सुकता होती. या चित्रपटाचं जोरदार प्रमोशनही करण्यात आलं होतं.
सध्या बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या 'जवान'ने धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनाच्या दिवसापासूनच या चित्रपटाने कोटींची कमाई करायला सुरुवात केली होती. ८ सप्टेंबरला प्रदर्शित झालेला 'जवान' अजूनही बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' सिनेमापुढे मोठं आव्हान आहे. हा सिनेमा किती कमाई करणार? याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
विकी कौशलच्या 'द ग्रेट इंडियन फॅमिली' सिनेमाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा सिनेमा पहिल्या दिवशी जवळपास २.५ कोटींची कमाई करेल, अशी शक्यता आहे. विकी कौशलबरोबर या सिनेमात मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत आहे. याबरोबर मनोज पाहवा, कुमुद मिश्रा, यशपाल शर्मा या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.