'छावा' सिनेमाने सध्या जगभरातील थिएटर दणाणून सोडले आहे. १४ फेब्रुवारी रोजी रिलीज झालेला सिनेमा अजूनही हाऊसफुल सुरु आहे. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका पडद्यावर जिवंत केली आहे. यामुळे त्याचं प्रचंड कौतुक होत आहे. तसंच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांचीही स्तुती होत आहे. आज महाशिवरात्रीनिमित्तविकी कौशलने (Vicky Kaushal) सोशल मीडियावर 'छावा' मधील तो सीन शेअर केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे लढायला जाण्यापूर्वी हर हर महादेव अशी गर्जना करायचे. छत्रपती संभाजी महाराजांनीही हाच वारसा पुढे नेला होता. 'छावा'सिनेमात विकी 'ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव' अशी गर्जना करतो. हाच सीन विकीने आज महाशिवरात्रीनिमित्त इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे जो अंगावर काटा आणणारा आहे. तसंच शंकराच्या पिंडीवर दुग्धाभिषेक करतानाचा सीनही त्याने दाखवला आहे. विकीने कॅप्शनमध्ये गर्जना लिहीत सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत 'छावा' मधील या सीनचा किस्सा सांगताना दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर म्हणाले होते की, "हा सीन शूट करताना फक्त हर हर महादेव एवढीच ती गर्जना स्क्रीप्टमध्ये होती. मात्र प्रत्यक्षात शूट करताना विकीच्या तोंडून आपसूकच 'ॐ नमः पार्वती पतये' असं आलं. मीही त्याला थांबवलं नाही कारण तेच जास्त चांगलं वाटलं. अशा प्रकारे सिनेमात या गर्जनेचा सीन शूट झाला होता."
'छावा' सिनेमाने जगभरात आतापर्यंत ४५० कोटी कमावले आहेत. तर देशात सिनेमाचा ३६२.२५ कोटींचा बिझनेस केला आहे. अजूनही सिनेमा थिएटरमध्ये जोरात सुरु आहे.