Vicky Kaushal: छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा 'छावा' (Chhaava) हा ऐतिहासिक चित्रपट 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी १४ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित झाला. गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रतीक्षेत होते. 'छावा' या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली. प्रदर्शित होताच 'छावा सिनेमाने महाराष्ट्रात सर्वांनाच वेड लावलं आहे. फक्त महाराष्ट्रात नाहीतर संपुर्ण देश आणि विदेशातही सर्वत्र 'छावा'ची तुफान चर्चा आहे. अशात विकी कौशलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
'छावा' सिनेमा थिएटरमध्ये हाउसफुल्ल गर्दीत सुरु आहे. सिनेमा पाहून प्रेक्षक भावूक झाल्याचं दिसून येतंय. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल याचे चाहते भरभरून कौतुक करताना दिसत आहेत. प्रेक्षकांकडून मिळत असलेलं प्रेम पाहून विकी भारावून गेलाय. इन्स्टाग्रामवर त्यानं खास पोस्ट शेअर केली आहे. आनंद व्यक्त करत त्याने सर्वांचे आभार मानले आहेत. त्यानं लिहलं, "तुमच्या सर्वांचं प्रेम पाहून माझं मन भरुन आलयं. सर्वांचे खूप खूप आभार", या शब्दात तो व्यक्त झाला.
'छावा'ची कमाई किती?
'छावा'ने बॉलिवूडला २०२५ वर्षाची दमदार सुरुवात करून दिली आहे. तर विकीसाठी 'छावा' हा त्याच्या आजवरच्या सिनेमांपैकी सर्वात मोठी ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कनुसार, 'छावा'नं पहिल्या दिवशीच तब्बल ३३.१ कोटींचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या दिवशी ३९.३ कोटींची कमाई केली. तर सॅकनिल्कच्या पोर्टनुसार, तिसऱ्या दिवशी अर्थात रविवारी ४८.५ कोटी एवढी कमाई केली आहे. अशाप्रकारे एकूण १२० कोटींच्या पार हा आकडा पोहोचला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित'छावा'चित्रपटाच्या निर्मितीसाठी १३० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. चित्रपटाची कमाई पाहता लवकरच निर्मिती खर्च वसूल होईल असं दिसत आहे.