काल रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने ऋषी कपूर यांना तातडीने मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथेच त्यांनी अंतिम श्वास घेतला. इरफान पाठोपाठ ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत तीन चित्रपटात काम केले होते. त्यांना हे वृत्त समजताच त्या खूप भावूक झाल्या. नुकतेच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात त्यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच अश्विनी यांच्या पहिल्याच चित्रपटाच्या वेळी केलेल्या मार्गदर्शन व सहकार्यासाठी त्यांनी सदैव त्यांच्या ऋणी राहीन असेदेखील सांगितले आहे.
अश्विनी भावे यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतच्या आठवणींंना उजाळा देत सांगितले की, आज ऋषीजी आपल्यामध्ये नाही आहेत, या बातमीवर विश्वास ठेवायला मनच धजत नाही आहे. खरंच, इरफान खानच्या निधनाच्या बातमीतून आपण सावरलेलो नाही आहोत आणि आज त्यात हा केवढा मोठा धक्का. इरफानही माझा सहकलाकार होता. ऋषीजींबरोबर मी तीन सिनेमात काम केली आहेत. हनीमून, हीना आणि मोहब्बत की आरजू. खूप महान कलाकारांना गमाविले आहे. वैयक्तिकरित्या सांगायचं म्हणायचं तर हिंदी सिनेसृष्टीत पदार्पणात म्हणजेच हीना चित्रपटाच्या शूटिंगवेळी ऋषीजींचे लाभलेले सहकार्य व मार्गदर्शन व प्रेम त्यावेळी जर मला मिळालं नसतं तर माझ्या नंतरच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीत जशी मी वावरले तसा वावरण्याचा आत्मविश्वास मला कधीच लाभला नसता. त्यामुळे त्यांच्या सहकार्य, मार्गदर्शन व प्रेमासाठी मी त्यांची आजन्म ऋणी राहीन.
त्यांच्यासोबत काम करण्यापूर्वी पासून मी त्यांची चाहती होती. ते माझ्यासाठी चॉकलेट हिरो होते. आमच्या अख्ख्या पिढीचेच ते चॉकलेट हिरो होते. त्यांचे प्रत्येक चित्रपट पाहिले. सगळी गाणी मला पाठ आहेत. त्यांचे गाण्यातील मुव्ह्ज व स्वेटर्सदेखील मला लक्षात आहेत. अशा माझ्या आवडत्या हिरोसोबत मला काम करायला मिळालं. तो अनुभव माझ्या साठी आठवणींचा एक ठेवा आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, एक अतिशय यशस्वी हिरो म्हणून इतकी वर्ष गाजविल्यानंतर आज कॅरेक्टर एक्टर म्हणून इमेज इतक्या सहजतेने बनवली. हे खूपच आश्चर्यकारक आहे.
यामुळे ऋषी कपूरमधील एक वेगळा अभिनेता आपल्यासमोर आला. त्यांची कॉमेडी, अग्निपथमधील खलनायकाचा रोल अशा त्यांच्या भूमिका पाहिल्यावर असे वाटले की अजून वेगळ्या प्रकारचे ऋषीजी आपल्यासमोर येतील. त्यात आता त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. खूपच दुःखद आहे. या कठीण प्रसंगी नीतूजी यांना उभे राहण्याची देव त्यांना ताकद देवो.संपूर्ण आरके कुटुंबाला ही ताकद लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. ऋषीजींच्या आत्म्यास शांती लाभो.