जगातील सर्वात मोठ्या चित्रपट पुरस्कारांपैकी एक म्हणजे ऑस्कर (Oscars) आणि हा पुरस्कार देणा-या अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेजने बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) , टेलिव्हिजनची ‘क्चीन’ म्हणून ओळखली जाणारी एकता कपूर (Ekta Kapoor) व तिची आई निर्माती शोभा कपूर (Shobha Kapoor) यांना निमंत्रण दिलं आहे. तिघींनीही हे निमंत्रण स्वीकारल्यास त्यांना पुढच्या वर्षी होणा-या ऑस्कर पुरस्कारांसाठी मतदान करण्याचा अधिकार मिळेल.
अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेजने या मतदानासाठी जगभरातील 395 लोकांची निवड केली आहे. यात विद्या बालन, एकता कपूर व शोभा कपूर यांच्या नावांचा समावेश आहे. ऑस्करसाठी मतदान करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 2021 च्या यादीत 45 टक्के महिलांचा समावेश करण्यात आला आहे, हे विशेष.विद्या, एकता व शोभा यांच्याआधी अनेक भारतीय स्टार्सला अॅकेडमीत सामील होणा-या आणि ऑस्करसाठी मतदान करण्याचा अधिकार मिळाला होता. यात प्रियंका चोप्रा, ऐश्वर्या राय, सलमान खान, दीपिका पादुकोण, इरफान खान, अमिताभ बच्चन, आमिर खान आदी कलाकारांचा समावेश आहे. ऑस्कर या जागतिक स्तरावरील प्रतिष्ठेच्या चित्रपट पुरस्कारांसाठी परीक्षकांनाही तितकेच महत्त्व असते.
विद्या बालन तिच्या अलीकडे रिलीज झालेल्या ‘शेरनी’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. याआधी परिणीता, भुल भुलैय्या, इश्किया, द डर्टी पिक्चर, कहानी, बेगम जान, तुम्हारी सुलू, शंकुतला देवी अशा अनेक सिनेमात तिने काम केले. या सर्वच सिनेमातील तिच्या दमदार अभिनयाचे कौतुक झाले होते. एकत कपूर आणि शोभा कपूर यांच्याबद्दल सांगायचे तर दोघीही बॉलिवूड व टीव्ही दुनियेतील दिग्गज निर्मात्या आहेत. द डर्टी पिक्चर, ड्रिम गर्ल, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, उडता पंजाब असे अनेक सिनेमांची निर्मिती त्यांनी केली आहे.