Join us

'शेरनी'मधील भूमिकेसाठी विद्या बालनने अशी केली तयारी, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 5:33 PM

शेरनी चित्रपटात विद्या बालन वन अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. आता लवकरच ती एका वेगळ्या भूमिकेत रसिकांच्या भेटीला येणार आहे. शेरनी या चित्रपटात ती वन अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी विद्या बालनने खूप मेहनत घेतली आहे. तिने 'शेरनी'साठी केलेल्या तयारीबद्दल सांगितले की,"ते आपली नोकरी प्रत्यक्ष कशी करतात हे जाणून घेण्यासाठी मी काही महिला वन अधिकाऱ्यांना भेटले."

विद्या बालन अभिनीत अमेझॉन प्राईम व्हिडीओचा आगामी ओरिजिनल चित्रपट 'शेरनी'चे कथानक वास्तविक जीवनात एक पथप्रदर्शक आहे, जो एक महिला वन अधिकारी, तिची नोकरी, लग्न आणि वैयक्तिक आयुष्य  या माध्यमातून तिचा स्त्री म्हणून असलेला प्रवास रेखाटतो. विद्या बालनने या चित्रपटातील आपल्या भूमिकेच्या तयारीवर प्रकाश टाकताना म्हटले की, "मी प्रत्यक्ष काही  महिला वन अधिकाऱ्यांना त्यांच्या नोकरीत कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो, हे समजून घेण्यासाठी भेटले... ज्यामध्ये एक वन अधिकारी बनण्यासाठीचे ट्रेनिंग, विभिन्न पोस्टिंग आणि नोकरी करताना समोर येणाऱ्या कठीण प्रसंगांशी निगडित अभ्यास येतो. या कामाची प्रकृती अशी आहे की अनेकदा हे शारीरिकरित्या कठीण आणि जोखमीचे देखील होऊ शकते, त्यामुळे पारंपरिकपणे यामध्ये पुरुष प्रधानता दिसते, मात्र या महिला अधिकाऱ्यांनी सांगितले की कशारीतीने पितृसत्तात्मक मानसिकतेतून आपला मार्ग शोधला आहे. हे सर्व काही खूप उपयुक्त ठरले." 

आपल्या व्यक्तिरेखेविषयी तिने सांगितले की, "विद्या विन्सेंटच्या बाबतीत मला जे आवडले ते हे की, तिचा ज्या गोष्टींवर विश्वास आहे त्यासाठी उभे राहण्याचे ती धाडस दाखवते. यासाठी तुम्हाला आक्रामक होण्याची किंवा पुरुषांच्या दुनियेत पुरुष होण्याची आवश्यकता नाही, तुम्ही एक महिला बनूनच राहू शकता आणि आपली वाट शोधू शकता." 

या सिनेमात विद्या बालन सोबत शरद सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राझ, इला अरूण, ब्रिजेंद्र काला आणि नीरज काबी यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.टी-सिरीज आणि अबंडनतिया एंटरटेनमेंटची निर्मित आणि अमित मसुरकर दिग्दर्शित शेरनी चित्रपट १८ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :विद्या बालन