सध्या भारतात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. उद्या ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर येईल. पुढील पाच वर्षांसाठी कोणता पक्ष देशात सत्ता स्थापन करणार याचं चित्र उद्या स्पष्ट होईल. अशातच विद्या बालनचा नवरा आणि सुप्रसिद्ध निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरने एक मोठी घोषणा केलीय. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच सिद्धार्थने आगामी बायोपिक सिनेमाची घोषणा केलीय.
पहिल्या निवडणुक आयुक्तावर येतोय बायोपीक
सिद्धार्थ रॉय कपूर यांच्या 'रॉय कपूर फिल्म्स'ने आज त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर याविषयी घोषणा केलीय. या माध्यमातून 'रॉय कपूर फिल्म्स' सुकुमार सेन यांच्यावर बायोपिकची निर्मिती करणार आहेत. सुकुमार सेन यांचा फोटो शेअर करताना प्रॉडक्शन हाऊसच्या वतीने लिहिले आहे की, 'गेल्या महिन्यात कोणते चिन्ह दाबून तुम्ही कोणाला मतदान केले याने काही फरक पडत नाही. खरं महत्व आहे तुमच्या बोटावरील त्या छोट्या काळ्या शाईला. आम्ही तुमच्यासाठी आणत आहोत एक अविश्वसनीय कथा जी तुम्ही चुकवू शकत नाही." अशाप्रकारे सुकुमार सेन यांच्या बायोपिकची घोषणा झालीय.
कोण होते सुकुमार सेन?
सुकुमार सेन यांचा जन्म २ जानेवारी १८९९ रोजी बंगाली बैद्य-ब्राह्मण कुटुंबात झाला. सुकुमार हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांनी २१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८ पर्यंत सेवा बजावली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने १९५१-५२ आणि १९५७ मध्ये, स्वतंत्र भारताच्या पहिल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले. त्यांनी १९५३ मध्ये सुदानमध्ये पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणूनही काम केले. स्वतंत्र भारताच्या निवडणुकांचे मास्टरमाईंड म्हणून सुकुमार सेन यांचं कौतुक केलं जातं. आता सुकुमार सेन यांची भूमिका कोण साकारणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.