Join us

विद्या बालनला निर्मात्याने समजले ‘पनवती’; मागितली चक्क जन्मपत्रिका!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 10:17 AM

सुरुवातीच्या दिवसांमध्ये विद्याला निर्माते ‘पनौती’ समजायचे. एका निर्मात्याने तर चक्क तिची जन्मपत्रिका बघूनच तिला काम दिले.

बॉलिवूडची बोल्ड आणि बिंधास्त ऊ ला ला गर्ल विद्या बालन हिने बॉलिवूडमध्ये स्वत:चे बळकट असे स्थान निर्माण केले आहे. कारण आज तिला इंडस्ट्रीमध्ये एक दमदार अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. अर्थातच विद्याला ही ओळख तिच्या अभिनयामुळे मिळाली आहे. कोणतीही भूमिका साकारताना त्यास दमदार करण्यासाठी विद्या ज्या पद्धतीने मेहनत घेते, ते खरोखरच कौतुकास्पद म्हणावे लागेल. त्यामुळेच विद्या बालनने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आज तिचा स्वतंत्र प्रेक्षकवर्ग असून, तिच्या प्रत्येक चित्रपटाची आतुरतेने वाटही बघितली जाते; मात्र विद्याला हे सर्व यश म्हणावे तेवढ्या सहजासहजी मिळाले नाही. यासाठी तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. विद्याच्या आयुष्यात एक काळ तर असा होता की, निर्माते तिला खूप मोठी ‘पनवती’ समजायचे. कदाचित हे वाचून तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाही, परंतु हे खरं आहे. काही निर्मात्यांनी तर केवळ विद्या या चित्रपटात काम करीत असल्याने ते चित्रपट रिलीजच होऊ दिले नाहीत. होय, विद्याने त्याकाळी अनेक बंगाली चित्रपटांमध्ये काम केले. परंतु विद्या या चित्रपटात असल्यामुळे प्रेक्षक त्यास स्वीकारणार नाहीत, या भीतिपोटी त्यांनी तिचे हे चित्रपट रिलीजच होऊ दिले नाहीत. त्यानंतर तर असा समज पुढे आला की, जो कोणी विद्यासोबत काम करणार त्याला नक्कीच तोटा सहन करावा लागणार. एका मुलाखतीदरम्यान विद्याने सांगितले होते की, ‘इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड स्ट्रगल करावे लागले. सुरुवातीला मी अनेक चित्रपटांसाठी आॅडिशन दिले; मात्र प्रत्येक ठिकाणी मला नकाराचा सामना करावा लागला. अशात मी खचून गेली नाही, मी माझे प्रयत्न सुरूच ठेवले. पुढे बोलताना विद्याने म्हटले की, जेव्हा मला ‘परिणिता’ हा चित्रपट मिळाला तेव्हा मला याकरिता कित्येकदा स्क्रीन टेस्ट द्यावी लागली. एवढेच नव्हे तर मला निर्मात्यांनी चक्क माझी जन्मपत्रिका मागितल्याचे विद्याने सांगितले होते. विद्याने सांगितले की, निर्मात्याला असे वाटले की, ही खरोखरच ‘पनवती’ तर नाही ना ? म्हणून त्यांनी चक्क माझी जन्मपत्रिकाच मागितली. मात्र या चित्रपटानंतर विद्याचे नशीबच बदलले. चित्रपटातील तिची भूमिका तर सरस ठरलीच, शिवाय समीक्षकांनीही तिच्या अभिनयाचे तोंडभरून कौतुक केले. पुढे विद्याला जेवढ्या संधी मिळाल्या, त्या प्रत्येक संधीतून तिने चाहत्यांची मने जिंकलीत. पुढे तर तिने असे चित्रपट केले, ज्यामुळे तिला एका उंचीवर स्थान मिळाले. ‘कहानी, कहानी-२ आणि डर्टी पिक्चर’सारख्या चित्रपटांनी विद्याचे नशीबच पालटले. सध्या विद्याने इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केलेली आहे.