अभिनेत्री विद्या बालन नेहमी आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी खूप मेहनत घेते. सध्या ती संगीतकार नितीन शंकर यांच्याकडून हार्मोनियमचे प्रशिक्षण घेते आहे. नितीन शंकर यांनी आर.डी.बर्मन, जतिन-ललित, अनु मलिक यांसारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. ती आगामी चित्रपटासाठी हार्मोनियमचे धडे गिरवित असल्याचे बोलले जात आहे.
विद्या बालन आगामी चित्रपटासाठी नितीन शंकर यांच्याकडून हार्मोनियमचे ट्रेनिंग घेत असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. मात्र अद्याप ती कोणत्या सिनेमासाठी प्रशिक्षण घेते आहे, हे समजू शकलेले नाही. ती लवकरच तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते व आंध्रप्रदेशमधील लोकांच्या देवस्थानी असलेले नेते एन. टी. रामाराव यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाच्या चित्रीकरणाला हैदराबादमध्ये सुरूवात करणार आहे. या चित्रपटात ती रामाराव यांच्या पत्नी बासव तारकम यांची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी विद्या हार्मोनियम शिकत असल्याचा तर्क लावला जातो आहे. विद्या बालन हार्मोनियममधील बारकावे शिकत आहे. केवळ सहा दिवसात ती बेसिक हार्मोनियम शिकली. तिचे प्रशिक्षक व संगीतकार नितीन शंकर यांनी विद्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओत नितीन शंकर विद्याचे कौतूक करीत आहेत. या व्हिडिओत विद्या बालन आपल्या गुरूंच्या सूचनेचे पालन करीत हार्मोनियम वाजवताना दिसते आहे. एन. टी. रामाराव यांच्या बायोपिकवर करोडो रुपये खर्च केले जाणार आहेत. या चित्रपटात विद्यासह अभिनेता रवि किशनही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तो रामाराव यांच्या जवळच्या मित्राची भूमिका बजावताना दिसणार आहे. रवि किशनने या चित्रपटात भूमिका मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे. रामाराव यांच्या मित्राची भूमिका साकारायला मिळणे ही मोठी संधी असून ही आम्हा भोजपूरींसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे रवि किशन म्हणाला.