Join us

विद्युत जामवाल सांगतोय, भारतीय आर्मीविषयी खास गोष्टी

By प्राजक्ता चिटणीस | Published: November 22, 2019 6:00 AM

विद्युत जामवालला भारतीय आर्मीविषयी प्रचंड प्रेम असून कमांडो 3 मध्ये त्याला कमांडोची भूमिका साकारायला मिळतेय याचा त्याला आनंद होत आहे.

ठळक मुद्देसैनिक आपल्या कुटुंबापासून दूर राहून अतिशय वाईट परिस्थितीत देखील देशाचे रक्षण करतात. त्यांना सन्मान देणे हे आपल्या प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.

कमांडो या चित्रपटाच्या आतापर्यंतच्या सगळ्याच भागांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. आता कमांडो 3 प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटात जुन्या कलाकारांसोबत काही नवीन कलाकार देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या विद्युत जामवालसोबत या चित्रपटाबाबत मारलेल्या गप्पा...

कमांडो या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कोणत्याही चित्रपटाच्या फ्रँच्यायजीमध्ये काम करताना अधिक दडपण असते का?कमांडो या चित्रपटाच्या या आधीचे सगळे भाग प्रेक्षकांना आवडल्यानंतर नवीन भागाबाबत प्रेक्षकांच्या मनात जास्त उत्सुकता असते. त्यामुळे थोडेसे दडपण तर असते. कमांडो या चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कोणत्याच भागाने 100 कोटी कमावले नाहीत. पण तरीही या चित्रपटाची कथा, अ‍ॅक्शन याला एक वेगळे फॅन फॉलोव्हिंग आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाच्या प्रत्येक भागात अतिशय वेगेवगळ्या प्रकारची अ‍ॅक्शन पाहायला मिळाली होती. कमांडो 3 या चित्रपटाच्या अ‍ॅक्शनसोबतच या चित्रपटाची कथा देखील खास आहे. देशावर हल्ला करण्याचा विचार करणाऱ्या शक्तीला एक कमांडो कशाप्रकारे रोकतो हे प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. देशावर संकट आल्यानंतर धर्म, जात विसरून सगळेजण एकत्र येतात. हाच संदेश या चित्रपटाद्वारे देण्यात आलेला आहे.

या चित्रपटात तू कमांडोच्या भूमिकेत आहेस, तुझ्या कुटुंबातील अनेकजण आर्मीत आहेत. तू कधी आर्मीत जाण्याचा विचार केला नाहीस का?माझ्या कुटुंबातील अनेकजण आर्मीत आहेत. मला आर्मी, नेव्ही, एअर फोर्सविषयी प्रचंड अभिमान आहे. मी माझ्या कुटुंबियांप्रमाणे आर्मीत भरती झालो नसलो तरी मी भारतातील विविध कॅम्पमध्ये असणाऱ्या आर्मीतील लोकांना भेट देतो. आपली आर्मी ही संपूर्ण जगातील श्रेष्ठ आर्मी आहे असे मला वाटते. आपल्या सैनिकांना अतिशय बिकट परिस्थितीत देखील कशाप्रकारे राहायचे याविषयी प्रशिक्षण दिले जाते. ते आपल्या कुटुंबापासून दूर राहून अतिशय वाईट परिस्थितीत देखील देशाचे रक्षण करतात. त्यांना सन्मान देणे हे आपल्या प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.

तू सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असतो. कधी तू सिलेंडर उचलताना दिसतोस, तर कधी एखादा स्टंट करताना, याविषयी काय सांगशील?माझ्या अ‍ॅक्शनवर माझे फॅन्स फिदा आहेत. माझे सोशल मीडियावरचे व्हिडिओ त्यांना प्रचंड आवडतात. हे व्हिडिओ पाहून काही लोकांना जरी या गोष्टी करण्यास प्रोत्साहन मिळाले तरी मला समाधान वाटते. 

अ‍ॅक्शन हिरोच बनायचे असे तू कधी ठरवलेस?माझ्या कुटुंबातील कोणीच फिल्म इंडस्ट्रीतील नाहीये. मी सुरुवातीला मॉडलिंग करत होते. पण त्याच्याआधीपासून मी अ‍ॅक्शन शिकत आहे. याच गोष्टीचा मी आता चित्रपटांसाठी वापर करतो. अ‍ॅक्शनविषयी मला प्रेम असल्यानेच मी अ‍ॅक्शन हिरो बनण्याचे ठरवले. 

टॅग्स :विद्युत जामवालकमांडो