Join us  

तो विनोद होता मूर्खांनो...; ‘अर्जुन रेड्डी’च्या ‘शिवा’नं आधी ‘संन्यास’ जाहिर केला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 5:51 PM

Rahul Ramakrishna post : सोशल मीडियावर चाहत्यांना ‘फूल’ बनवणारा हा अभिनेता कोण तर राहुल रामकृष्ण. याला तुम्ही ‘अर्जुन रेड्डी’ सिनेमात पाहिलं असेल.

झगमगत्या फिल्मी दुनियेतील कलाकारांचे लक्झरी आयुष्य सर्वांनाच खुणावतं.  त्यांचं अलिशान जगणं, त्यांची लोकप्रियता पाहून अनेकदा डोळे दिपतात. अर्थात प्रत्येकाच्याच वाट्याला हे स्टारडम येत नाही. या झगमटाआड आणखी एका न्याऱ्या दुनियेत राहणारेही अनेकजण आहेत. त्यामुळे अनेकजण स्टार बनण्याचं स्वप्नं घेऊन इथे येतात.  या झगमगत्या दुनियेचा मोह सोडणं सोप्प नाहीच मुळी. आता साऊथचा अभिनेता आणि कॉमेडियन राहुल रामकृष्ण  (Rahul Ramakrishna) याचंच उदाहरण घ्या. राहुल रामकृष्णने काल एक धक्कादायक पोस्ट शेअर करत,  फिल्मी दुनियेला कायमचा रामराम ठोकत असल्याचं जाहिर केलं आणि त्यानंतर काही तासांत ‘मी मस्करी करत होतो मूर्खांनो...,’ म्हणत हा सगळा प्रँक असल्याचं स्पष्ट केलं.हा राहुल रामकृष्ण कोण तर याला तुम्ही ‘अर्जुन रेड्डी’ (Arjun Reddy) सिनेमात पाहिलं असेल. या सिनेमात राहुलने विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarakonda )मित्राची म्हणजेच शिवाची भूमिका साकारली होती.  

शेअर केली पोस्टअभिनेता राहुल रामकृष्णने शुक्रवारी  संध्याकाळी आपल्या ट्विटर हॅन्डलवरून  चित्रपटसृष्टी सोडत असल्याचा निर्णय जाहीर केला.  ट्विटरवर एक छोटी नोट लिहित त्याने या निर्णयाची माहिती दिली.

 ‘2022 माझं शेवटचं वर्ष आहे.. मी आता आणखी कोणत्याही चित्रपटात काम करणार नाही. या निर्णयाची मला अजिबात चिंता नाही आणि इतर कोणालाही याबद्दल चिंता नसावी,’ अशी पोस्ट त्याने शेअर केली. त्याची ही पोस्ट पाहून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. असं काय घडलं की राहुलने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

चाहते संभ्रमात असताना अचानक काही तासानंतर राहुलने पुन्हा एक पोस्ट केली. ‘हा एक विनोद होता मूर्खांनो. मी इतका पैसा असलेले, विलासी आयुष्य का फेकून देऊ? माझे मित्र मला कॉल करून निवृत्तीबद्दल माझं अभिनंदन करत आहेत, यावर माझा विश्वास बसत नाहीये,’असं त्याने या ट्विटमध्ये म्हटलं.

या चित्रपटात साकारल्या भूमिकाराहुल रामकृष्णने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात थारुण भास्कर धश्याम दिग्दर्शित  सैनमा  या लघुपटातून केली होती. यानंतर श्रीनिवास रेड्डी आणि पूर्णा स्टारर ‘जयमु निश्चमु रा’ या चित्रपटाद्वारे त्याने टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. विजय देवरकोंडा स्टारर ‘अर्जुन रेड्डी’तील शिवाच्या भूमिकेने तो अचानक प्रकाशझोतात आला होता. या सुपरडुपर हिट सिनेमातील राहुलच्या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं होतं.  गीता गोविंदम या चित्रपटातदेखील त्याने विजय देवरकोंडाच्या मित्राची भूमिका साकारली होती. याशिवाय भारत अने नेनु, सम्मोहनम, ची ला सो, हुशारू, अला वैकुंठपुरमुलू, जाति रत्नालू या सिनेमात त्याने सहकलाकाराची भूमिका वठवल्या होत्या.

टॅग्स :विजय देवरकोंडाTollywood