Join us

"बँक खात्यात फक्त १८ रुपये, सेटवरुन हाकललं अन्...; विजय वर्माने दिला आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 4:17 PM

जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं बँकेत केवळ १८ रुपये होते तेव्हा मला एक फोन आला...

बॉलिवूड अभिनेता विजय वर्माने (Vijay Varma) 2008 साली इंडस्ट्रीत प्रवेश केला. तेव्हापासून त्याने 'पिंक', 'गली बॉय','सुपर 30','डार्लिंग्स' सारख्या सिनेमांमध्ये काम केले. तर नुकत्याच रिलीज झालेल्या 'दहाड' या वेबसिरीजमधील त्याच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. विजय वर्माच्या आयुष्यात एक वेळ अशीही आली जेव्हा त्याच्या बँक खात्यात फक्त 18 रुपये शिल्लक राहिले होते. 

नुकत्याच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत विजय म्हणाला, "माझ्यासाठी नेहमीच स्क्रीप्ट आणि भूमिका हेच प्राधान्य राहिलं आहे. पण एकवेळ अशी आली जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं बँकेत केवळ १८ रुपये होते तेव्हा मला एक फोन आला. रिपोर्टरच्या एका छोट्या भूमिकेसाठी मला विचारणा झाली. यासाठी ३००० रुपये मिळणार होते. मला खरंतर कधीच अशी भूमिका करायची इच्छा नव्हती पण मी तो रोल स्वीकारला. शूटिंगला सुरुवात झाली. माझं मन लागत नव्हतं कारण मी प्रत्येक टेकमध्ये अडखळत होतो."

तो पुढे म्हणाला, "माझे डायलॉग इंग्रजीत होते आणि मला वाटलं की इंग्रजी बोलणाऱ्या रिपोर्टरची भूमिका निभावणं कठीण आहे. मला सेटवरुन काढून टाकण्यात आलं. तोपर्यंत मी मान्सून शूटआऊट पूर्ण केलं होतं ज्यात मी मुख्य भूमिकेत होतो. यामुळे मला जास्तच वाईट वाटत होतं. मी त्यावेळी खूप रडलो. तेव्हा मी स्वत:ला सांगितलं की फक्त पैशांसाठी कधीच काही करायचं नाही. ही २०१४ ची गोष्ट आहे आणि तेव्हापासून मी फक्त पैशांसाठी कधीच काम केलं नाही."

विजय वर्माला 2016 साली आलेल्या 'पिंक' सिनेमाने ओळख दिली. नुकताच त्याचा 'जाने जान' सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. आता तो आगामी 'अफगानी स्नो','मर्डर मुबारक' आणि 'सूर्या 43' या सिनेमात दिसणार आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूड