मुंबई - ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. विक्रम गोखले यांच्या निधनानं मराठी इंडस्ट्रीसह बॉलिवूडमध्येही शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात मृत्यूशी संघर्ष करत होते. विक्रम गोखले यांच्या निधनाची माहिती रुग्णालय प्रशासनानं पत्रकार परिषद घेऊन दिली. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार असून आज सायंकाळी ६ वाजता वैंकुठभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
विक्रम गोखले यांच्या निधनानंतर बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. खेर यांनी विक्रम गोखलेंचा १४ दिवसांपूर्वीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात लेजेंड्री एक्टर कविता वाचताना दिसून येतात. अनुपम खेर यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, मला हा मेसेज माझ्या जवळचा मित्र आणि देशातील सर्वोकृष्ट अभिनेता विक्रम गोखले याच्याकडून मिळाला होता. मी त्यांना फोन केला आणि म्हटलं तुम्ही जी कविता मला पाठवली आहे ती अर्धवट आहे. तेव्हा त्यांनी सांगितले जिंदगी भी अधूरी है मेरे दोस्त आणि हसायला लागले अशी आठवण खेर यांनी शेअर केली.
विक्रम गोखले यांच्या निधनानं मला धक्का बसला. अलीकडेच मी द सिग्नेचर सिनेमाचं शुटींग पूर्ण केले जे विक्रम गोखले यांचा मराठी सिनेमा 'अनुमती' याचं हिंदी रिमेक आहे. यावर आमचं बोलणं झाले होते. त्यांनीही मला विचारलं होतं सिनेमा कधी पूर्ण होणार आहे? तेव्हा तुम्हाला दाखवण्याआधी नर्व्हस आहे असं मी म्हटलं. त्यावरून ते हसले अन् म्हणाले, मग तर चांगलेच केले असेल. मला दु:ख या गोष्टीचं आहे की आता ते हा सिनेमा कधीच पाहू शकणार नाहीत. विक्रम गोखले, तुम्ही नेहमी माझे चांगले मित्र राहाल असं सांगत अनुपम खेर यांनी भावूक प्रतिक्रिया दिली.
'बॅरिस्टर' नाटकातून मिळाली खरी ओळखविक्रम गोखलेंनी आयुष्यात अनेक भूमिका केल्या पण त्यांची खरी ओळख आहे ती बॅरिस्टर. जयवंत दळवी लिखित हे नाटक मराठी नाटकांमधील एक दर्जेदार नाटक म्हणून मानलं जातं. मानवी नातेसंबंधांची अनोखी बाजू या नाटकाने मांडली. बॅरिस्टर या नाटकात विक्रम गोखले आणि त्यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी एकत्र काम केले होते. याशिवाय कथा, कमला, के दिल अभी भरा नही, छुपे रुस्तम, नकळत सारे घडले, दुसरा सामना,सरगम, स्वामी अशा अनेक नाटकात त्यांनी काम केले होते. मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय संन्यास घेतला होता.