संजय घावरे
मागच्या आठवड्यात रिलीज झालेला 'विक्रम वेधा' सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. यात हृतिकनं साकारलेल्या वेधाचं कौतुक होत आहे. या चित्रपटाचं औचित्य साधत 'लोकमत'शी एक्सक्लुझीव्ह गप्पा मारताना हृतिकनं दसऱ्यासोबतच्या नात्यावरही प्रकाश टाकला.
'विक्रम वेधा'ची ऑफर स्वीकारावीशी का वाटली?- २०१७ मध्ये ओरिजनल 'विक्रम वेधा' पाहिल्यावर मी म्हणालो होतो की, याचा जर हिंदी रिमेक बनला, तर त्यात मला काम करायला आवडेल. त्यानंतर काय घडलं माहित नाही, पण हा चित्रपट फिरून माझ्याकडेच आला. २०२०मध्ये याची आॅफर आली, तेव्हा मी खूप आश्चर्यचकित झालो. हिंदी चित्रपटाचं स्क्रीप्ट आलं. मी ते वाचलं आणि ओके म्हटलं.
वेधाच्या कॅरेक्टसाठी स्वत:ला कसं तयार केलंस?- सुरुवात केली तेव्हा वेधापर्यंत कसं पोहोचायचं समजत नव्हतं. तो कसा दिसेल, बोलेल, वागेल, चालेल याबाबत काहीच समजत नव्हतं. एक-एक स्टेप चढत वेधापर्यंत पोहोचलो. मी नेहमी कॅरेक्टरला शोधण्याची सुरुवात केसांपासून करतो. केसांची स्टाईल सेट झाल्यावर कॅरेक्टर थोडं समजतं, कपड्यांमधून गवसतं, चालण्यातून उलगडतं, बोलीभाषेच्या लहेजाद्वारे त्या कॅरेक्टरच्या जवळ पोहोचतो. शूट सुरू होण्यापूर्वी एक-दोन महिने काम केल्यानं वेधा साकारणं सोपं गेलं.
वेधा स्वीकारण्यात रिस्क वाटली का?- डोळ्यांनी मला जे दिसत होतं तो फक्त सिनेमा आणि त्यातील कॅरेक्टर होतं. भूतकाळात काय घडलंय आणि भविष्यात काय घडेल हा विचार करायला माझ्या डोक्यात जागाच नव्हती. इतका मी त्या कॅरेक्टरमध्ये घुसलो होतो. भूतकाळाचा विचार मनात न आल्यानं हि व्यक्तिरेखा साकारण्यात रिस्क असू शकते हा विचार मनाला शिवलाही नाही.
लेखन-दिग्दर्शनाबाबत काय सांगशील?- चित्रपटाची कथाच हिरो आहे. याचं लेखन खूपच सुंदर केलं आहे. पुष्कर-गायत्री यांना हे कसं सुचलं ते सांगता येणार नाही. खूप छोट्या-छोट्या गोष्टी या चित्रपटाला कमर्शिअल बनवतात. यात हिरोचा स्वॅग, अॅक्शन, गाणी, डान्स आणि हेलावून टाकणारी कथाही आहे. अशी स्क्रीप्ट मिळाल्यावर नकार देण्याचा प्रश्नच नसतो.
तू फार चित्रपट करावे अशी चाहत्यांची इच्छा असताना कमी चित्रपट का करतोस?- ज्या गोष्टी मला आयुष्यात हव्या त्याचा बॅलन्स साधणं सक्सेसपेक्षा खूप महत्त्वाचा मानतो. बॅाक्स आॅफिस सक्सेस, पैसे, फेम हे ठराविक मर्यादेपर्यंत महत्त्वाचं आहे, पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा वेळ आहे. मुलांसाठी-कुटुंबासाठी, वाचनासाठी, जगण्यासाठी, प्रवासासाठी, सामाजिक कार्यासाठी वेळ देणं, स्वत:ला आणखी प्रशिक्षीत करून सुधारणा करणं या सर्व गोष्टी मी करत असतो. जर फक्त चित्रपटच करत राहिलो, तर यासाठी वेळ देऊ शकणार नाही. मी जर अभिनयाचं दुकान मांडलं, तर अॅक्टर राहणार नाही. बिझनेसमन बनेन. माझ्यासाठी अभिनय हे दुकान नाही. केवळ पैशांसाठी काम करायचं नाही.
आणखी काय करायची इच्छा आहे?- इच्छा खूप आहेत, पण मुख्य इच्छा ही आहे की, गिव्ह एक्स्प्रेशन टू माय हायर पर्पज इन माय लाईफ. हा हायर पर्पज काय आहे त्याचा शोध घेतोय. तो पर्पज जेव्हा मला साध्य होईल तेव्हा मी समाधानी होईन.
२० वर्षांनी पुन्हा सैफसोबतचा अनुभव कसा होता?- सैफसोबत खूप इनक्रेडीबल अॅक्टर आहे. त्याच्यासोबत काम करताना एक प्रकारची सहजता जाणवते. त्याच्या कामात कमालीचा खरेपणा जाणवतो. खूप वास्तववादी काम करतो. उगाच दिखाऊपणा करत नाही.
दसऱ्यासोबतचं तुझं नातं कसं आहे?- दसऱ्यासोबत माझं अनोखं कनेक्शन आहे. लहान असताना नवरात्रीमध्ये देव्हाऱ्यात घटस्थापना केल्यावर बाजूला स्क्रीप्टस ठेवल्या जायच्या. नऊ दिवस देवी मातेची पूजा व्हायची. खूप वेगळी शक्ती आजूबाजूला भरून राहिल्याचं जाणवायचं. दुर्गा मातेचा आणि तिच्या शक्तीचा अर्थ समजावला जायचा. योगायोग म्हणजे दसऱ्याच्या दिवशीच 'विक्रम वेधा'ची सुरुवात झाली आणि या दसऱ्याला रिलीज झाला आहे.