मोठ्या पडद्यावर अलीकडच्या वर्षात यशस्वी झालेले सिनेमे बोटावर मोजण्याइतकेच आहेत. त्यामुळे बॉलिवूडला सावरण्याची मदार आता सिनेमांच्या 'सिक्वेल'वर आलीय; असं चित्र सध्या हिंदीच्या पडद्यावर तयार झालंय. त्यामुळे सिनेकर्त्यांवर आणि प्रेक्षकांवर ‘सारा जमाना सिक्वेल का दीवाना’ असं म्हणायची वेळ आलीय. बॉक्स ऑफिसच्या पडद्यावरील खणखणीत कामगिरी पाहता सिनेमाचा सिक्वेल व्हावा,अशी मागणी सिनेरसिकांचीदेखील असते. यातच आता दिग्दर्शक विधू विनोद चोप्राच्या '12 वी फेल' (12th Fail) सिनेमाच्या सिक्वेलची मागणी चाहते करताना दिसून येत आहेत. यावर आता खुद्द अभिनेता विक्रांत मेसीने (Vikrant Massey) खुलासा केला आहे.
विधू विनोद चोप्राच्या '12 वी फेल' चित्रपटाने केवळ प्रेक्षकांनाच आकर्षित केले नाही तर विक्रांत मॅसीच्या कारकिर्दीतील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक ठरला आहे. सामान्य लोकांपासून, समीक्षकांपासून ते बॉलिवूडच्या दिग्गजांपर्यंत या चित्रपटाचे आणि विक्रांतच्या अभिनयाचे सर्वांनी भरभरून कौतुक केले होते. आता नुकतेच विक्रांत मेसीने एका मुलाखतीत '12th Fail 2' च्या सिक्वेलबद्दल सांगितले आहे.
'इंडिया टुडे'शी बोलताना विक्रांत म्हणाला, '12वी फेल' सारखा चित्रपट बनवण्याबाबत अनेक लोकांकडून कॉल येत आहेत. पण मी स्वत:ला एका प्रकारच्या पात्रापुरते मर्यादित ठेवू इच्छित नाही. जर लोकांना एक गोष्ट आवडली असेल तर त्यांना असे आणखी चित्रपट बघायचे आहेत. जसे की 'हसीन दिलरुबा' सिनेमा. पण या सिनेमाची कथा अशा ठिकाणी सोडली होती की, यानंतर तिच्या आयुष्यात पुढे काय येते हे पाहण्याची शक्यता होती? पण '12वी फेल'च्या सिनेमाच्या बाबतीत असं नाही'.
पुढे तो म्हणाला, खरं सांगायचं तर मला वाटतं नाही की '12वी फेल' चा सिक्वेल येऊ शकेल. लोकांना त्याचा सिक्वेल पाहण्याची इच्छा आहे. पण, ते योग्य असेल का? म्हणजे, हा एक सामूहिक निर्णय आहे, जो आपल्या सर्वांना घ्यायचा आहे'. दरम्यान, '12वी फेल' हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि आयआरएस अधिकारी श्रद्धा जोशी यांच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात विक्रांतने मनोज शर्माची भूमिका साकारली असून मेधा शंकरने श्रद्धा जोशीची भूमिका साकारली आहे. विक्रांतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल तर येत्या 9 ऑगस्टला त्याचा 'फिर आयी हसीन दिलरुबा' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.