'12th फेल' फेम अभिनेता विक्रांत मेसी (Vikrant Massey) त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. तो लवकरच 'द साबरमती रिपोर्ट' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच त्याची एक मुलाखत चर्चेत आली आहे.
नुकतंच विक्रांत मेसीने शुभंकर मिश्राला मुलाखत दिली. यावेळी भाजपबद्दलचे त्यांचे बदललेले विचार आणि हिंदू धर्माकडे असलेला त्यांचा कल यावर भाष्य केलं. तो म्हणाला, "ज्या गोष्टी मला वाईट वाटत होत्या, त्या प्रत्यक्षात वाईट नाहीत आणि जे लोक मला चांगले वाटत होते, ते चांगले नाहीत. लोक म्हणतात की हिंदूंना धोका आहे, मुस्लिमांना धोका आहे. पण तसे काही नाही. कोणीही धोक्यात नाही. सर्व काही ठीक चालले आहे".
पुढे तो म्हणाला, " हा देश राहण्यासाठी जगातील सर्वोत्तम देश आहे. तुम्ही युरोपात जा, फ्रान्सला जा. तुम्हाला सत्य परिस्थिती कळेल. हा फक्त एक देश आहे जिथे माणूस राहू शकतो. आणि हाच देश जगाचे भविष्य आहे. मी भाजपचा खूप मोठा टीकाकार होतो. पण देशात फिरल्यानंतर मला या गोष्टीची जाणीव झाली की सगळं इतकं वाईट नाही. देशात मुस्लिम धोक्यात नाही. मागिल 10 वर्षात देशात बरचं काही बदललं आहे, त्याप्रमाणे माझं मत देखील बदललं आहे".
विक्रांत मेसीचा 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट 2002 मध्ये गुजरातमधील गोध्रा घटनेवर आधारित आहे. 'द साबरमती रिपोर्ट' मध्ये विक्रांत मुख्य भूमिकेत आहे. एकता कपूरने सिनेमाची निर्मिती केली असून धीरज सरना यांनी दिग्दर्शित केला आहे. 'द साबरमती रिपोर्ट' १५ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. विक्रांतने पुन्हा एकदा त्याच्या अप्रतिम अभिनयाचं सादरीकरण केलं आहे.