'12th Fail' या सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेला विक्रांत मेस्सी 'द साबरमती रिपोर्ट' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २००२ साली गोध्रा येथे घडलेल्या सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा आहे. १५ नोव्हेंबरला 'द साबरमती रिपोर्ट' सर्वत्र प्रदर्शित झाला. ट्रेलरपासूनच विक्रांत मेस्सीच्या या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता होती. पण, बॉक्स ऑफिसवर मात्र या सिनेमाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनीदेखी विक्रांत मेस्सीच्या 'द साबरमती रिपोर्ट' सिनेमाचं कौतुक केलं आहे. पण, प्रेक्षकांनी मात्र या सिनेमाकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसत आहे. ५० कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाला ४ दिवसांत बॉक्स ऑफिसवर फार कमाई करता आलेली नाही. 'द साबरमती रिपोर्ट' सिनेमाचं चार दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'द साबरमती रिपोर्ट' सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशी १.२५ कोटींचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाला २.१ कोटींची कमाई करता आली. तिसऱ्या दिवशी म्हणजे पहिल्या रविवारी ३ कोटींचा गल्ला सिनेमाने जमवला. तर चौथ्या दिवशी केवळ १.१० कोटींचं कलेक्शन सिनेमाला करता आलं आहे. 'द साबरमती रिपोर्ट' सिनेमाने चार दिवसांत फक्त ७.४५ कोटींची कमाई केली आहे.
'द साबरमती रिपोर्ट' सिनेमात विक्रांत मॅसी, राशी खन्ना आणि रिद्धी डोग्रा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्सने केली आहे. विक्रांत मेस्सी 'द साबरमती रिपोर्ट' मध्ये स्थानिक पत्रकाराच्या भूमिकेत आहे. २००२ साली झालेल्या गोध्रा ट्रेन अग्रीकांड प्रकरणानंतरच्या सत्य घटनेवर सिनेमा आधारित आहे.