60-70 च्या दशकात या अभिनेत्रीने सर्वांना वेड लावले होते. तिचे नाव काय तर विमी. होय, बी. आर. चोप्रा यांचा ‘शोध’ असलेल्या विमीने बॉलिवूडमध्ये ‘हमराज’मधून डेब्यू केला होता. एका पार्टीत बी. आर. चोप्रा यांनी विमीला पाहिले आणि अगदी तिथल्या तिथे त्यांनी तिला आपल्या चित्रपटाची ऑफर दिली. विमी देखील एका पायावर तयार झाली. पण घरच्यांचा विरोध होता. होय, कारण विमी एकतर विाहित होती. सासर आणि माहेर दोघांचाही तिच्या अभिनेत्री बनण्यास विरोध होता. पण विमीने सगळ्यांचा विरोध पत्करून निर्णय घेतला आणि ती थेट मुंबईला पोहोचली.
बी. आर. चोप्रांनी मुंबईतल्या ताज हॉटेलात तिची राहण्याची व्यवस्था केली आणि विमीची स्क्रिनटेस्ट झाली. बी. आर. चोप्रा उत्साहात होते. या उत्साहाच्या भरात त्यांची चित्रपटाची घोषणा केली आणि पहिल्याच चित्रपटात विमी राज कुमार आणि सुनील दत्त यांच्यासोबत कॅमे-यापुढे उभी झाली. पण हे काय? विमीकडे भरभरून सौंदर्य असले तरी अभिनयात मात्र ती भोपळा होती. अशास्थितीत बी. आर. चोप्रा यांनी विमीच्या तालमी घेणे सुरु केले. अखेर कसेबसे सिनेमाचे शूटींग पूर्ण झाले आणि चित्रपट प्रदर्शित झाला. पण हे विमीचे भाग्यच म्हणावे. कारण अभिनयात शून्य असूनही तिचा पहिला सिनेमा सुपरहिट झाला आणि विमीच्या घराबाहेर निर्मात्यांच्या रांगा लागल्या. पण विमीच्या पतीने तिच्या करिअरची वाट लावली.
होय, असे म्हणतात की विमीचा पती तिला प्रचंड छळ करायचा. कोणत्या दिग्दर्शकाचा, कोणता चित्रपट करायचा याचा निर्णय तोच घ्यायचा. यामुळे विमीला साईन करताना दिग्दर्शक, निर्माते कचरू लागले. विमीने वचन, पतंगा, आबरू हे सिनेमे केलेत. पण आधीच पतीच्या लुडबुडीमुळे विमीला चित्रपट मिळणे बंद झाले होते. शिवाय तिचे हे सिनेमेही दणकून आपटले.
विमीचा नवरा विमीच्या पैशावर अवलंबून होता. हिरोईनची लाईफस्टाईल म्हणून विमी नव-यासोबत जूहूला एका बंगल्यात रहायला आली होती. जूहूच्या बंगल्याचे भाडे देणे अशक्य झाल्यानंतर ते दोघे पाली हिलवरील एका बंगल्यात राहू लागले. फक्त आपण इथे राहतो हे दाखवण्यासाठी ते भाडे भरत असत. प्रत्यक्षात विमीला इथल्या लाईटचे बिल देखील भरता येत नव्हते. पैशाकडून अवस्था खराब झाल्यानंतर नवरा तिला निर्मात्यांसोबत झोपण्याची विनंती करु लागला. अस केल्यानंतर तरी तिला काम मिळेल अस त्याला वाटतायचे. पण इतके करूनही विमीला हळूहळू काम मिळणे बंद झाले.
याचदरम्यान जॉली नावाच्या एका निर्मात्याने तिला घेवून एक सिनेमा करण्याची कल्पना मांडली. विमी जॉलीच्या गोड गोड गोष्टींवर भाळली. तोपर्यंत विमीने नवºयाला सोडले होते. असे म्हणतात की, विनीने या जॉलीसोबत लग्नही केले. मात्र जॉली देखील भुरटा निघाला आणि विमी एकटी पडली. याकाळात तिचे मानसिक आरोग्य बिघडले. ती दारूच्या आहारी गेली. पैसे नसल्याने हातभट्टीची दारू पिऊन ती दिवसभर नशेत असायची.
या व्यसनाने विमीचे लिव्हर खराब झाले. तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. इथेच तिने प्राण सोडला. दुर्देव म्हणजे, पाच सहा लोकांनी तिचा मृतदेह हातगाडीवर लोटत नेला. बेवारस व्यक्तिसारखे मरण तिच्या वाट्याला आले.