कलाविश्वात सेलिब्रिटींच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा बऱ्याचदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा रंगत असते. यात खासकरुन त्यांची लव्हलाइफ जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक असतात. यामध्येच सध्या विंदू दारा सिंह आणि अभिनेत्री फराह नाज हिची चर्चा रंगली आहे. दारा सिंह यांचा लेक विंदू दारा सिंह याने अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण फराह नाज हिच्यासोबत संसार थाटला होता. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही.
विंदू दारा सिंह (vindu dara singh) याने १९९६ मध्ये फराह नाज (farah naaz) हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. २००२ मध्ये ही जोडी विभक्त झाली. त्यानंतर विंदूने २००६ मध्ये मॉडेल दीना उमरोवा हिच्यासोबत लग्न केलं. तर, फराहने अभिनेता सुमित सहगलसोबत लग्न केलं. विशेष म्हणजे दारा सिंह (dara singh) यांनी फराहसोबत लग्न करु नकोस असा सल्ला विंदूला दिला होता. मात्र, त्याने तो ऐकला नाही. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने याविषयी भाष्य केलं.
"मी वेगळ्या धर्मात लग्न करु नये, असा सल्ला माझ्या वडिलांनी दिला होता. पण मी ऐकलं नाही. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. फराहचं माझ्या कुटुंबियांशी चांगले संबंध होते. आमच्या घरात कोणीही धुम्रपान करत नव्हतं. ती एकमेव व्यक्ती होती जी धुम्रपान करायची. पण, हजला जाऊन आल्यानंतर फराहच्या वागण्यात खूप बदल झाला", असं विंदू दारा सिंह म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "घटस्फोटानंतर फराहने कित्येक महिने मला फतेह या माझ्या मुलाला भेटू सुद्धा दिलं नव्हतं."दरम्यान,या मुलाखतीमध्ये त्यांनी फराहचं कौतुक सुद्धा केलं. तिने एकटीने मुलाचा सांभाळ उत्तमरित्या केला, असंही ते या मुलाखतीमध्ये म्हणाले.