‘मुक्काबाज’ हा चित्रपट पाहिलेल्या सिनेप्रेमींसाठी विनीत कुमार सिंह हे नाव नवे नाही. या चित्रपटातील विनीत कुमारचा अभिनय सगळ्यांनाच सुखावून गेला. प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडण्यात विनीत यशस्वी झाला. कदाचित म्हणूनच ‘मुक्काबाज’नंतर लगेच अक्षय कुमार स्टारर ‘गोल्ड’ या चित्रपटात त्याची वर्णी लागली. विनीतसाठी ही संधी कुठल्या सुवर्णसंधीपेक्षा कमी नव्हती आणि म्हणूनच कुठल्याही स्थितीत ही संधी त्याला गमवायची नव्हती. याच प्रयत्नांत त्याने एक मोठी गोष्ट ‘गोल्ड’ची दिग्दर्शिका रीमा कागती यांच्यापासून लपवून ठेवली.
‘मुक्काबाज’नंतर लगेच ‘गोल्ड’च्या ट्रेनिंगसाठी विनीत विदेशात रवाना झाला होता. याठिकाणी त्याला अन्य कलाकारांसोबत हॉकी खेळायचे होते. याचदरम्यान विनीतच्या पायाला दुखापत झाली. या दुखापतीमुळे पायावर सूज आली. पण आपल्या दुखापतीची बातमी रीमाला कळली तर ती आपल्याला चित्रपटातून काढून टाकेल, अशी भीती विनीतला सतावू लागली. ‘गोल्ड’सारखा मोठा चित्रपट विनीतला गमवायचा नव्हता. मग काय, त्याने अनेक दिवस दुखापतीची बातमी रीमापासून लपवून ठेवली.अलीकडे एका मुलाखतीत विनीतने हा खुलासा केला. ‘गोल्ड’ माझ्यासाठी खूप मोठी संधी होती. पायाला दुखापत झाल्याचे कळताच आपल्याला चित्रपटातून काढले जाईल, अशी भीती मला होती. म्हणून मी ही गोष्ट रीमापासून लपवून ठेवली. जखम दिसू नये म्हणून मी पायात मोजे घालायचो व त्यावर हॉकी गार्ड लावून प्रॅक्टिस करायचो. पण काही दिवसांनी रीमाला माझ्या दुखापतीबद्दल कळले आणि तिने मला चांगलेच खडसावले. तू सिलेक्ट झाला आहेस. आता घाबरू नकोस. तुला कुणीही चित्रपटातून बाहेर काढणार नाही. आता जा आणि आराम कर. शूटींग सुरु झाले की, तुला बोलवू, असे ती मला म्हणाली. मी लहानपणी प्रत्येक खेळ खेळला. पण मला कधीच बक्षिस मिळाले नाही. कायम काही ना काही चूक दाखवून मला डावलले गेले. पण आज चांगला फेज आहे. मी काम करतोय आणि मी खूप आनंदी आहे, असे विनीत म्हणाला.
विनीत कुमार सिंहने सिटी आॅफ गोल्ड, बॉम्बे टॉकिज, गँग आॅफ वासेपूर अशा अनेक चित्रपटांत अभिनय केला आहे. अनुराग कश्यपच्या ‘मुक्कबाज’ या चित्रपटात विनीत प्रथम लीड रोलमध्ये दिसला.