बॉलिवूडमध्ये 'छावा' सिनेमाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित 'छावा' सिनेमात विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे. विकीशिवाय सिनेमात कवी कलशच्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेता विनीत कुमार सिंहनेही (Vineet Kumar Singh) लक्ष वेधलं. त्याच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. दरम्यान विनीतच्या एका सिनेमातील अभिनय पाहून चक्क रणबीर कपूरनेही (Ranbir Kpaoor) त्याला फोन करत त्याची प्रशंसा केली होती.
अभिनेता विनीत कुमार सिंहने एका मुलाखतीत रणबीर कपूरचा किस्सा सांगितला. रणबीर त्याचा 'अगली' सिनेमा पाहून प्रभावित झाला होता. त्याने विनीतला कॉलही केला होता. पण विनीतला त्याचा कोणी मित्र मस्करी करतोय असं वाटलं होतं. विनीत म्हणाला, "मला रणबीर कपूर खूप आवडतो. २०१३ मध्ये त्याने मला माझा 'अगली' सिनेमा पाहून फोन केला होता. मी रणबीर बोलतोय असं तो म्हणाला. मला वाटलं माझा तर कोणी रणबीर नावाचा मित्र नाही. मी म्हणालो, 'कोण रणबीर?'. तेव्हा अगली सिनेमा रिलीज झाला नव्हता. पण रणबीरने आधीच पाहिला होता. मला विश्वासच बसत नव्हता की खरोखरंच रणबीरने फोन केला आहे."
विनीत पुढे म्हणाला, "मी जेव्हा परत विचारलं की खरं सांग बाबा कोण बोलतंय? तर तो म्हणाला, 'मी रणबीर कपूरच आहे'. मग मला विष्वास बसला. आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या. त्याने 'अगली' सिनेमाबद्दल त्याला आवडलेलं खूप काही सांगितलं. तो ग्रेट रणबीर कपूर आहे त्याला खरं तर मला मेसेज करण्याची काय गरज होती? पण तरी त्याने केला हे किती भारी आहे. मी सुद्धा रणबीरचं काम पाहून त्याला मेसेज करतो. दोन कलाकार अशा प्रकारे एकमेकांना प्रोत्साहन देतात हे पाहून मला छान वाटलं."
विनीत कुमार सिंहचा 'अगली' सिनेमा हा अनुराग कश्यपने दिग्दर्शित केला होता. या सिनेमाचं क्रिटिक्सने खूप कौतुक केलं होतं. रणबीर अनुराग कश्यपच्याच 'बॉम्बे वेल्वेट' मध्ये काम करत होता तेव्हा त्याने अगली हा सिनेमा बघितला.