मरेंगे तो वहीं जा कर....! लॉकडाऊनमधील स्थलांतरित मजुरांच्या व्यथा दाखवणारा ‘1232 KM’, पाहा ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 10:31 AM2021-03-17T10:31:43+5:302021-03-17T10:33:48+5:30
महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आणि यानंतर भारताच्या रस्त्यावर जे चित्र दिसले ते पाहून प्रत्येक संवेदनशील मन हळहळले. आता या मुद्यावर एक सिनेमा येतोय.
24 मार्च 2020 रोजी कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आणि यानंतर भारताच्या रस्त्यावर जे चित्र दिसले ते पाहून प्रत्येक संवेदनशील मन हळहळले. स्थलांतरित मजुरांचे जत्थेच्या जत्थेचा पायी आपआपल्या घराकडे निघाले. बायको-मुलांसह उपाशापोटी निघालेल्या या लोकांपैकी अनेकांचा वाटेतच मृत्यू झाला. आता या मुद्यावर एक सिनेमा येतोय. होय, ‘1232KM’ या सिनेमाचे नाव. या सिनेमात स्थलांतरित मजुरांची व्यथा दाखवण्यात आली आहे. पत्रकार व दिग्दर्शक विनोद कापडी यांनी बनवलेल्या या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला.
चित्रपटाचे नाव एका मजूराच्या कहाणीवर आधारित आहे.
या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे, विनोद कापडी यांनी यात ओरिजनल फुटेजचा वापर केला आहे. लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर आपले काय होणार, या भीतीने सैरभैर झालेल्या स्थलांतरित मजुरांची कथा यात दाखवण्यात आली आहे. गुलजार यांनी या सिनेमाची गाणी लिहिली आहेत तर विशाल भारद्वाज यांनी या गाण्यांना संगीत दिले आहे. ट्रेलरच्या बॅकग्राऊंडमध्ये सुखविंदर सिंह यांचा आवाज आहे. विनोद कापडी हे पत्रकार आहेत. अनेक टीव्ही चॅनेलमध्ये त्यांनी मोठमोठी जबाबदारी सांभाळली आहे. याआधी ‘मिस टनकपूर हाजिर हो’ या सिनेमाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. त्यांचा 1232KM हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर येत्या 24 मार्चला प्रदर्शित होतोय.