वयाच्या केवळ ४५ व्या वर्षी जगाला अलविदा म्हणणारे अभिनेते विनोद मेहरा आज हयात असते तर आपला ७४ वा वाढदिवस साजरा करत असते. ७० व ८० च्या दशकातील ‘चॉकलेट हिरो’ म्हणून विनोद मेहरा ओळखले जाते. विनोद मेहरा आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे काही यादगार सिनेमे आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. १३ फेबु्रवारी १९४५ मध्ये जन्मलेल्या विनोद मेहरा यांची अभिनयाची कारकिर्द आणि व्यक्तिगत आयुष्य दोन्ही प्रचंड गाजले. अभिनेत्री रेखासोबतच्या गुपचूप लग्नाचा त्यांच्या आयुष्यातील एक एपिसोड तर मोठ्या चर्चेचा विषय ठरला.
अमृतसरमध्ये विनोद मेहरा यांचा जन्म झाला. त्यांची बहीण शारदा चित्रपटांत सहाय्यक भूमिका करायची. याचदरम्यान विनोद मेहरा यांना बालकलाकार म्हणून अभिनयाची संधी मिळाली. ‘रागिणी’ या चित्रपटात त्यांनी किशोर कुमार यांच्या लहानपणीची भूमिका साकारली. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. साहजिकच अनेक चित्रपटात त्यांना बालकलाकाराच्या भूमिका मिळाल्या. बेवकूफ आणि अंगुलीमाल या चित्रपटात ते बालकलाकार म्हणून दिसले. अर्थात याऊपरही अभिनेता त्यांचं अभिनेता व्हायचं कोणतंच ध्येय नव्हतं.
१९६५ मध्ये विनोद मेहरा यांनी एका प्रायव्हेट कंपनीत मार्केटींगची नोकरी पत्करली. ही नोकरी करत असतानाच काही मित्रांनी त्यांना ‘आॅल इंडिया टॅलेंट कॉन्टेस्ट’मध्ये भाग घेण्यासाठी तयार केले. मित्रांच्या आग्रहास्तव विनोद मेहरा यांनीही या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत राजेश खन्ना यांच्यासह सुमारे दहा हजार स्पर्धक होते. या स्पर्धेत विनोद मेहरा जवळपास फायनल विनर होते. मात्र ऐनवेळी विजेता म्हणून राजेश खन्ना यांचे नाव जाहिर झाले आणि ते सुपरस्टार बनले. विनोद मेहरा या स्पर्धेचे उपविजेते ठरले.
यानंतर एकेदिवशी निर्माता शौरी यांची नजर त्यांच्यावर गेली. त्यांनी विनोद मेहरा यांना ‘एक थी रिता’ या चित्रपटाची आॅफर दिली. या चित्रपटात त्यांची हिरोईन होती,अभिनेत्री तनुजा. विनोद मेहरा यांच्या करिअरला गती देण्यात अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांचा मोठा हात आहे. ‘अनुराग’या चित्रपटात मौसमी व विनोद यांची जोडी सर्वप्रथम पडद्यावर आली.
विनोद मेहरा यांच्या करिअरची गाडी सूसाट पळू लागली असतानाच त्यांच्या आईला आपल्या मुलाच्या लग्नाची चिंता सतावू लागली. विनोद आईची प्रत्येक गोष्ट मानायचे. त्याचमुळे आईच्या आवडीच्या मीना ब्रोका या मुलीसोबत विनोद यांनी विवाह केला. पण याचदरम्यान चोर पावलांनी आलेल्या हृदयरोगाने त्यांना ग्रासले होते. लग्नानंतर काहीच दिवसांत विनोद यांना हृदयविकाराचा पहिला धक्का आला. यातून ते थोडक्यात बचावले.
याचकाळात अभिनेत्री बिंदिया गोस्वामी हिच्यावर विनोद मेहरांचा जीव जडला. मग काय, पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच विनोद मेहरा यांनी बिंदियासोबत लग्न केले. पण काहीच वर्षांत बिंदियाने अचानक दिग्दर्शक जेपी दत्तासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि विनोद मेहरा यांना घटस्फोट दिला.
बिंदियाला घटस्फोट दिल्यानंतर एकाकी पडलेले विनोद मेहरा अभिनेत्री रेखाच्या जवळ आले. रेखासोबतचा विनोद मेहरा यांचा रोमान्स त्यावेळी प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. दोघांची गुपचूप लग्न केल्याची चर्चा त्यावेळी होती. अर्थात रेखा वा विनोद मेहरा यांनी कधीच याची कबुली दिली नाही. यासिर उस्मान यांच्या ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ पुस्तकात केलेल्या दाव्यानुसार, रेखा विनोद मेहरा यांच्याशी लग्न करून सासरी आल्या त्यावेळी त्यांच्या सासूने त्यांना मारण्यासाठी चप्पल हातात घेतली होती. इतकेच नाही तर त्यांना घराबाहेरही हाकलवून लावले होते. रेखा यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या तेथून निघून गेल्या. विनोद मात्र तिथेच आपल्या आईला समजवत राहिले.
आईच्या म्हणण्यावरून विनोद मेहरांनी रेखासोबतचे नाते तोडत तिसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. १९८८ मध्ये त्यांनी किरणसोबत लग्न केले. किरणपासून विनोद मेहरा यांना रोहन आणि सोनिया अशी दोन मुले झालीत. पण या लग्नानंतर दोनच वर्षांत विनोद मेहरा यांनी जगाचा निरोप घेतला. ३० आॅक्टोबर १९९० रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
विनोद निर्मिती क्षेत्रातही उतरले. ‘गुरुदेव’या चित्रपटाद्वारे त्यांनी निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. यात ऋषीकपूर, अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अर्थात हा चित्रपट रिलीज होण्याआधीच विनोद मेहरा यांना हृदयविकाराचा धक्का आला.