सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. त्यामुळे सर्वजण आपल्या आयुष्यातील प्रत्येक घडामोडी सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. यामध्ये सेलिब्रेटी मंडळी आघाडीवर आहेत. लॉकडाऊनमध्येही सेलिब्रेटी कुकींग सारख्या गोष्टी करत त्यांची आवडी- निवडी जोपासताना दिसले. लॉकडाऊन उठवल्यानंतर सेलिब्रेटी आता व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे फोटो शेअर करताना दिसतायेत. तर काही शूटिंगला जाण्याआधी आपली कोरोना टेस्ट करत असल्याचे व्हिडीओ शेअर करताना पाहायला मिळत आहेत.
नुकतेच कॅतरिना कैफनेही शूटिंगला सुरूवात करण्याआधी कोरोना चाचणी केल्याचा व्हिडीओ शेअर केला अशा प्रकारे व्हिडीओ शेअर करणारी कतरिना एकमेव अभिनेत्री नाही तर जवळपास बॉलिवूडमधील सर्वच कलाकार अशा प्रकारे कोरोना टेस्ट करतानाचे व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
मात्र एका अभिनेत्याला हा ट्रेंड काही रूचला नाही. त्याने सेलिब्रेटींवर निशाणा साधत चांगलाच समाचार घेतला आहे. हे व्हिडीओ पाहून सेलिब्रिटींचे चाहते कदाचित खूश असतीलही पण अभिनेता वीर दास मात्र व्हि़डीओ शेअर करणा-या सेलिब्रिटींवर जाम वैतागला आहे. वीर दासनेच अशा सेलिब्रेटींवर आश्चर्यव्यक्त करत म्हटले आहे की, जी व्यक्ती पीपीईकीट घालून दिवसरात्र घरोघरी जाऊन कोरोना चाचणी करतेय त्यात खरे कौतुकास्पद आहे. उगाच आपले कोरोना टेस्ट करत असल्याचे व्हिडीओ शेअर करत कलाकार मंडळी काय पटवून देण्याचा प्रयत्न करत, यात कसला मोठा संघर्ष तुम्ही करत आहात हेच कळत नसल्याचे त्याने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून असे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
वीर दास पाठोपाठ निखिल द्विवेदीनेही असेच काहीसे ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.अनेक सेलिब्रिटी सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. जणू काही दुसरी मुंबई भासावी, इतके सेलिब्रिटी येथे व्हॅकेशनवर आले आहेत. आता व्हॅकेशन म्हटल्यावर या व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचीही चढाओढ दिसतेय.
देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले, बेरोजगारी वाढत असताना सेलिब्रिटी मालदीवमधील व्हॅकेशनचे फोटो शेअर करण्यात गुंग आहेत, असे ट्वीट बरखा यांनी केले. त्यांच्या या ट्वीटला उत्तर देताना निखील द्विवेदीनेही ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.