Sunil Gavaskar Dance on Natu Natu Song of RRR: सोमवारचा दिवस भारतीयांसाठी आनंददायी ठरली. एकीकडे भारताला ऑस्करमध्ये दोन पुरस्कार मिळाले आणि दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर ऑस्करमध्ये दोन पुरस्कार मिळाल्यानंतर खूप आनंदी दिसत होते. इतकेच नव्हे तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये त्यांनी 'नाटू नाटू' गाण्यावर डान्सही केला.
अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना अनिर्णित राहिला. सामन्याच्या पाचव्या दिवशी एक रंजक दृश्य पाहायला मिळाले. एका बाजूला भारतीय खेळाडू मैदानात सामना खेळत होते आणि दुसऱ्या बाजूला सीमारेषेबाहेर सुनील गावस्कर नाटू-नाटू गाण्यावर नाचत होते. वास्तविक, RRR चित्रपटातील या गाण्याला 'सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा' पुरस्कार मिळाला. त्याचवेळी 'द एलिफंट व्हिस्पर्स'ने लघुपट डॉक्युमेंटरी प्रकारात ऑस्कर पुरस्कार पटकावला. त्यावेळी गावसकरांनी भन्नाट डान्स केला. पाहा व्हिडीओ-
तसेच स्टार स्पोर्ट्स तेलुगु वाहिनीवरील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या सुरुवातीच्या आधी, संपूर्ण संघ ऑस्करमध्ये नाटू-नाटूचा विजय साजरा करत होता. गावसकर म्हणाले, "हे घडले याचा मला खूप आनंद आहे. संपूर्ण RRR टीमचे अभिनंदन. ज्यांनी गाणी संगीतबद्ध केली त्यांचे अभिनंदन. कलाकार अप्रतिम होते. मी चित्रपट पाहिला. हा एक उत्तम चित्रपट होता. ते जिंकले याचा मला खूप आनंद आहे.''
काय घडलं मॅचमध्ये?
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या आणि जवळपास दोन दिवस फलंदाजी केली. यानंतर भारतीय संघानेही जवळपास दोन दिवस फलंदाजी करत ५७१ धावा केल्या. त्यानंतरच हा सामना अनिर्णित राहण्याचा निर्णय घेण्यात आला. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दोन गडी गमावून 175 धावा केल्या. यानंतर कर्णधार आणि सामनाधिकारी दोघांनीही सामना बरोबरीत सोडवण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत हा सामना नियोजित वेळेच्या जवळपास दीड तास आधी संपला. सामना अनिर्णित राहिल्याने, भारताने चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी राखली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2021-23 चक्रातील ही भारताची शेवटची मालिका होती. या विजयासह टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियन संघ आधीच अंतिम फेरीत पोहोचला होता. आता हे दोन्ही संघ इंग्लंडमध्ये ७ ते ११ जून दरम्यान अंतिम सामना खेळणार आहेत.