अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) गेल्या वर्षीच फेब्रुवारी महिन्यात मुलाला जन्म दिला. अकाय (Akaay Kohli) असं त्याचं युनिक नाव ठेवलं गेलं. चिमुकल्या अकायचा जन्म लंडनमध्ये झाला. पुढच्या महिन्यात तो एक वर्षाचा होईल. अकाय अगदी विराटसारखाच दिसतो विराट-अनुष्काला भेटलेल्या अनेकांनी सांगितलं होतं. मात्र चाहत्यांना एकदाही त्याची झलक दिसली नव्हती. आता नुकतंच कोहली कुटुंब मुंबईत परतलं. यावेळी चाहत्यांना अकायचा चेहरा दिसलाच. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
विराट आणि अनुष्काला वामिका ही मुलगी आणि अकाय हा मुलगा आहे. दोघंही मुलांची प्रायव्हसी जपतात. त्यामुळे अद्याप वामिकाचाही त्यांनी चेहरा लपवला आहे. अकायच्या जन्मानंतर तर विराटच्या चाहत्यांना त्याला पाहण्याची खूप उत्सुकता होती. ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका संपल्यानंतर नुकतेच विराट-अनुष्का मुलांसोबत मुंबईत आले. तेव्हा विमानतळामधून बाहेर पडत असताना अनुष्काच्या कडेवर असणारा चिमुकला अकाय कॅमेऱ्यात कैद झालाच. त्याचा गोलू मोलू चेहरा पाहून तो खरोखर बालपणीचा विराटच आहे अशी अनेकांनी प्रतिक्रिया दिली. त्याची काही सेकंदाची साधी झलकही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. एका फॅन पेजवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अकाय एकदम विराटसारखाच दिसत आहे अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. तर अनेकांनी त्याची तुलना सैफ-करीनाचा मुलगा जेहशी केली आहे. 'किती क्युट आहे','एकदम गोलगप्पा दिसतोय' अशा शब्दात चाहत्यांनी अकायवर प्रेम व्यक्त केलं आहे.
दरम्यान ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिका संपल्यानंतर मुंबईत येण्यापूर्वी विराट आणि अनुष्का दोन्ही मुलांसह वृंदावनमध्ये पोहोचले होते. तिथे त्यांनी प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले. महाराजांच्या सोशल मीडियावर पेजवर व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. यामध्येही विरुष्काची मुलं त्यांच्या मांडीवर बसले होते मात्र त्यांचा चेहरा ब्लर करण्यात आला होता.